पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४२
भारतीय लोकसत्ता

होता. भांडवलसत्ता ही ईश्वरदत्त असते हा भ्रम नष्ट करून सर्व सत्ता जनतेकडून मिळत असते हें अमेरिकेंत प्रत्यक्षांत सिद्ध करणे हे अध्यक्ष विल्सन यांचें ध्येय होते. हे ध्येय सतत डोळ्यापुढे ठेवून आपल्या चारित्र्याच्या पुण्याईनें त्यांनी ते बव्हंशी साध्य केले होतें.
 फ्रँकलिन डेलानो रूझवेल्ट यांच्या चरित्राचें हेंच सार आहे. त्यांच्या पत्नी एलिनॉर या ध्येयवादी होत्या. 'दलित जनतेचा दुःखभार हलका करण्यासाठी कांहीं उपाययोजना झालीच पाहिजे आणि ती करणे हे तुमचें जीवितकार्य आहे' अशी प्रेरणा पतीला त्या नित्य देत असत. त्यांच्याहि चित्तांत या थोर कार्याचे स्फुरण झाले आणि मग लोकसेवेच्या खडतर मार्गानें रूझल्वेट यांनी प्रवास सुरू केला व अखेर शिखर गांठले. प्रारंभापासूनच स्वपक्षांतल्या श्रेष्ठींच्या विरुद्ध त्यांनी पाय रोवला होता. नवीनच उगवलेल्या या 'उपटसुंभाला' प्रथम कोणी विचारीना. पण पैशाला व अन्य मोहांना तो वश होत नाहीं असें दिसतांच ते दचकले व डोळे चोळून पाहूं लागले. त्याच्या सत्यापुढे त्यांना नमावें लागले. धनशक्तीशी उभा दावा असूनहि चार वेळां फ्रँकलिन रूझवेल्ट हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊं शकले. हा महिमा त्याग, ध्येयनिष्ठा यांचाच आहे. गेल्या शतकाच्या प्रारंभी धनशक्तीशीं ज्यांनी संग्राम सुरू केला त्या जेफरसनपासून दीडशें वर्षांनी तो संग्राम त्याच निष्ठेने लढविणाऱ्या रूझवेल्टपर्यंत अमेरिकेचे हे सर्व थोर पुरुष लोकशाहीच्या यशाचें रहस्य आपणांस समजावून देत आहेत.
 धनशक्ति व लोकशक्ति यांचा अमेरिकेत झालेला लढा जरा सविस्तर वर्णून त्याचें जें वर विवेचन केले त्यांत एक हेतु आहे. आपल्यापुढे आपली लोकशाही यशस्वी कशी करावी हा बिकट प्रश्न येऊन पडला आहे. त्यासाठीं मी जो उपाय सुचविणार आहे तो एरवीं विपरीत, विसंगत व असयुक्तिक वाटण्याचा संभव आहे; पण अमेरिकेतील हा लढा आपण नीट समजावून घेतला तर बहुधा तसे होणार नाहीं असें वाटते. माझ्या मते सध्यां तरुण भारतीय नागरिकांनी बहुसंख्येनें काँग्रेसमध्ये शिरणे अवश्य आहे. काँग्रेसच्या अधःपाताचें, तिच्या नीतिभ्रष्टतेचं इतके वर्णन केल्यानंतर त्याच संस्थेत प्रवेश करावयास सांगणे हे अत्यंत विपरीत असें वाटेल. व्याख्यानांत,