पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४१
मानवपुनर्घटना

कीं, या सर्व अनुभवावरून रुझवेल्ट यांच्या मनाची खात्री झाली की, व्यक्तीचे नैतिक सामर्थ्य हीच समाजाचे भवितव्य ठरविणारी निर्णायक शक्ति होय. प्रारंभी सांगितलेले मानवधन ते हेंच होय.
 अध्यक्ष विड्रो विल्सन यांनी हेच धोरण पुढे चालवून धनशक्तीशीं संग्राम चालू ठेविला. त्यांच्या चारित्र्याची कीर्ति आधीच सर्वत्र पसरली होती. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षानें आपण होऊन त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून त्यांना न्यूजर्सीचं गव्हर्नरपद स्वीकारण्याची विनंति केली. ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे की धनाचे स्वामी किंवा भांडवलदार किंवा पक्षाचे पडद्यामागचे जेठी यांना जनतेला प्रिय असलेल्या चारित्र्यसंपन्न माणसांची नेहमींच आवश्यकता असते. आपली व्यभिचारकर्में लपविण्यासाठीं त्यांना कुंकवापुरता पति हवा असतो. केव्हांहि पाहिलें तरी राष्ट्रांत जागरूक जनता हीच निर्णायक शक्ति असते. या जागरूक जनतेला आपल्या पाठीशी घेण्यासाठी त्यांना असा एखादा पुरुष हवाच असतो. तो पक्षांत आला की आपल्या चौकटीत बसवून त्याला निस्तेज करून टाकावयाचें हे त्यांचे धोरण असतें. आणि हा माणूस कच्चा असला तर तेथें त्या सुखासनावर बसून आपल्या नांवाचा त्या जेठींना उपयोग करूं देतो. विड्रो विल्सनवर डेमोक्रॅटिक पक्षांतील जेठींना हाच प्रयोग करावयाचा होता; पण ह्या पुरुषाची ध्येयनिष्ठा अभंग असल्यामुळे त्यांचीच आंतडी फाडून तो बाहेर आला. पक्षाचा चालक जिमस्मिथ याच्याच डोक्यावर त्यानें पहिला घण घातला. तो निवडणुकीस उभा रहाणार होता; पण 'तूं चारित्र्यहीन व नालायक आहेस' असे सांगून विल्सननी, त्यांच्याच पक्षांत तो असूनहि, त्याला विरोध केला आणि त्याने उर्मट उत्तरें करतांच जनतेपुढे त्याच्यावर भडिमार करून त्याची हाडें मोडून टाकली. दातीं तृण घरून विल्सनपुढें त्याला शरणागति पतकरावी लागली. विल्सन हा एक शिक्षकाचा पेशा असलेला सामान्य माणूस त्यानें या तमोगुणी धनशक्तीला कशाच्या जोरावर नमविलें ! पैशाच्या जोरावर धनवंतांनी वश केलेली लोकशक्ति चारित्र्याच्या बळावर त्यानें खेचून आपल्या मागें आणली ! याच सामर्थ्याच्या जोरावर त्यांनीं आपलें श्रेष्ठ ध्येय साध्य करून घेतले. पूर्वी राजसत्ता ही ईश्वरदत्त असते असे मानीत. आतां भांडवलदारांचा तसाच समज होऊं लागला