पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४०
भारतीय लोकसत्ता

जनहितबुद्धि, आत्मयज्ञ करण्याची वृत्ति म्हणजेच चारित्र्य निर्माण होतें आणि मग जे सामर्थ्य धनसत्तेचे गुलाम होऊन पडलेले असते, तेंच राष्ट्रसेवेच्या कारणीं लागते. म्हणून सार्वजनिक प्रपंचांत लोकसेवा करतां करतां तनमन झिजवीत स्वतः चारित्र्य ही महाशक्ति संपादन करणे व इतरांच्या ठायी ती निर्माण करणे हा एकच मार्ग भारतीय तरुणांनी यापुढे अवलंबिला पाहिजे.
 या शतकाच्या आरंभी आठ वर्षे अमेरिकेचे अध्यक्ष असलेले थिओडोर रूझवेल्ट यांनी याच बळावर भांडवली सत्तेला नमविले. रिपब्लिकन पक्षांत प्रवेश करून प्रथम राष्ट्रीय प्रपंचांतील विशुद्ध चारित्र्याची महती ते वर्णू लागळे, तेव्हां त्या पक्षाचे मालक म्हणजे तेथील धनश्रेष्ठी त्यांना हसूं लागले. त्यांना एका बाजूला नेऊन त्यांनी पोक्तपणे उपदेश केला की, 'राजकारणांत नैतिक शुद्धि आणण्याच्या वेड्या कल्पना तूं सोडून दे. स्वतःचे कल्याण साधणे हेंच तुझें उद्दिष्ट ठेव. बहुजनांच्या कल्याणाच्या नादी लागणे व येथल्या श्रेष्ठींच्या धनाला व सत्तेला मर्यादा घालणे हा तुझा धंदा नव्हे. यांत तूं फुकट मरशील.' थिओडोरने हा उपदेश मानला नाहीं व आपली शुद्धीची मोहीम सुरू केली. न्यायखात्यांतील लांचखाऊपणा प्रथम त्यानें उघडकीस आणला. नंतर रेल्वेकारभारावर हल्ला चढविला. न्यूयॉर्कची एलिव्हेटेड रेल्वे कंपनी सर्व विधिमंडळाला लांच देण्यास तयार होती. तो डाव त्यानें हाणून पाडला. नंतर त्याने पोलीस खात्यांत प्रवेश करून घेतला व ते सर्व खाते पोलीसांच्या पितळी बटनाप्रमाणे लखलखीत करून टाकलें. हा दणका पहातांच रिपब्लिकन पक्षांतील जेठी वचकले. त्यांनी त्याला उपाध्यक्षपद देण्याचे ठरविले. अमेरिकेंत उपाध्यक्षपद हें कर्त्या पुरुषांचें थडगे आहे असे मानतात. कारण त्या आसनावर गेलेल्या माणसाचा जनतेशी संबंध रहात नाहीं व मग तो शक्तिहीन होतो. आणि म्हणूनच रिपब्लिकन जेठींनीं थिओडोर रुझवेल्ट यांना तेथे गाडून टाकण्याचा विचार केला. पण त्यांच्या दुर्दैवाने अध्यक्ष मॅकिनले यांचा एक महिन्यांतच खून होऊन रुझवेल्ट अध्यक्षपदी आले. तेथे येतांच ट्रस्टस्, वंबाइन्स्, कार्पोरेशन्स यांच्या नियंत्रणाचे कायदे करून जनतेचे बळ त्यांच्या मागें उभें करून त्यांनीं धनसत्तेला नामोहरम केलें. एवढे सांगून चरित्रकार म्हणतो