पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३९
मानवपुनर्घटना

चारित्रकार म्हणतो, 'जेफरसनला असें दिसून आले की, अमेरिकेनें ब्रिटनचें जूं झुगारून दिलें तरी ती खरी स्वतंत्र झालेली नाहीं. दुसरी एक मदांध व जुलमी सत्ता आपल्या देशाला बेड्या घालणार असे त्याला दिसूं लागलें. ती सत्ता म्हणजे धनसत्ता होय. अमेरिकन क्रांतीत ज्यांनी आपले रक्त सांडलें त्यांना आतां असें आढळून आले कीं, इंग्लिश राजशाही आपण नष्ट केली, पण तिच्या जागी तितकीच अनियंत्रित व जुलमी अशी धनशाही प्रस्थापित होऊं पहात आहे. धनाचे उत्पादन करणारे कष्टाळू लोक व त्यांची पिळवणूक करणारे धनिक लोक यांचा संग्राम झडणार हे स्पष्ट दिसूं लागलें. या संग्रामांत जेफरसननें कष्टाळू जनतेची बाजू घेतली आणि अखेर धनसत्तेवर मात केली. या वेळी धनशक्तीने आपले सर्व सामर्थ्य पणास लावून जेफरसनविरुद्ध फळी उभी केली होती. असे असूनहि हा लढा जेफरसननें कशाच्या बळावर जिंकला हे समजून घेण्यासाठी भारतातील तरुण नागरिकांनी जेफरसनच्या चरित्राचा जरूर अभ्यास करावा.
 अब्राहम लिंकन यांच्याजवळहि ध्येयनिष्ठा, चारित्र्य याखेरीज दुसरे कोणचेंहि बळ नव्हते. चारित्र्य याचा एक विशिष्ट अर्थ येथे अभिप्रेत आहे. सार्वजनिक प्रपंच प्रामाणिकपणें, निःस्वार्थी बुद्धीनें व ध्येयनिष्ठेनें करण्याची प्रवृत्ति हा तो अर्थ आहे. अनंत यातना सोसाव्या लागल्या, तुरुंग, छळ किंवा देहदंडहि सोसावा लागला तरी लोक सेवाव्रतापासून च्युत न होता मृत्यूलाहि भिवविणारें जें धैर्य हे पुरुष प्रगट करतात, त्याचें नांव चारित्र्य. या मार्गात तुरुंग किंवा मृत्यु यांच्याप्रमाणेच अनेक प्रकारचे लोभमोहहि आड येतात. त्यांना जिंकून आपले व्रत अखंडपणे चालविण्याचा जो निर्धार तें चारित्र्य होय. या चारित्र्याला दुर्जय अशी कोणचीहि शक्ति जगांत नाहीं आणि याचे कारण अगदीं उघड आहे. माणूस ध्येयनिष्ठेनें झिजत राहिला, की त्याला पाहून लोक जागे होऊं लागतात. त्याची ध्येयनिष्ठा जसजशी कसाला लागत जाते, तसतसें त्याचें तेज वाढू लागतें व लोक त्याच्या नेतृत्वाखाली संघटित होतात आणि मग देशांत लोकशक्ति निर्माण होते. धनिक लोक पैशाच्या बळावर एरवी लोकांना वश करून ठेवीत असतात; पण चारित्र्याची पुण्याई अशी आहे कीं, तिच्यामुळे लोकांच्या मनांतील धनमोह नष्ट होऊन त्यांच्या ठायीं त्यागबुद्धि,