पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३८
भारतीय लोकसत्ता

केली पाहिजे, कोणचे प्रयत्न केले पाहिजेत, हा आपल्यापुढे महत्त्वाचा प्रश्न आहे.
 आपल्याला जो लढा लढावयाचा आहे, तो सत्त्व विरुद्ध तमोगुण असा लढा आहे. लोकसत्तेमध्ये हा लढा अटळ असतो. ब्रिटन व अमेरिका या जगांतल्या बलशाली व यशस्वी अशा लोकसत्ता आहेत. त्यांना प्रारंभापासून हा लढा लढावा लागलेला आहे. दोनहि देशांत औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अत्यंत प्रबळ होऊन लोकांच्या तमोगुणांना आवाहन करून अनियंत्रित होऊं पहात होती; या वेळी तेथे या धनशक्तीशी लोकशक्तीनें कसा संग्राम केला हें पहाणे उद्बोधक होईल आणि त्यावरून कदाचित् आपल्याला आपली लोकसत्ता यशस्वी करण्याचा मार्ग सांपडेल.
 थॉमस जेफरसन, ॲब्राहम लिंकन, थिओडोर रूझवेल्ट, विड्रो विल्सन, व फ्रँकलिन रूझवेल्ट या पांच अमेरिकन थोर पुरुषांनी अमेरिकेतील हीन प्रवृत्तींशी संग्राम करून तेथील लोकसत्ता यशस्वी केली आहे. त्यांनी हा संग्राम कशाच्या बळावर केला हें आपण पाहूं लागलो, तर आपणांस एक अगदीं निश्चित, अगदीं निर्णायक असें उत्तर मिळते. ते बळ म्हणजे चारित्र्य हे होय. एक ध्येयवादी निष्ठावंत पुरुष लोकसेवेचे व्रत घेऊन, त्याच्या आड येणाऱ्या स्वार्थी धनशक्तीशीं प्राणपणाने झुंज घेण्यास सिद्ध झाला, ध्येयवादाच्या आगीत तो सततं जळत राहिला की, त्याच्या तेजांतून अनेक स्फुल्लिंग बाहेर पडतात व मग अनेक निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होतात. सर्व देशभर धनशक्तीनें चालविलेल्या अन्यायाचा त्यांनीं डांगोरा पिटण्यास प्रारंभ केला कीं, कालांतराने लोकशक्ति जागृत होते आणि तिच्यापुढे धनशक्तीला– कोणच्याहि पापशक्तीला-नमावें लागतें. लोकसत्तेच्या यशाचा हा एकमेव राजमार्ग आहे.
 अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जार्ज वॉशिंग्टन निवृत्त झाल्यावर तेथील राजकारणांत दोन पक्ष उघड दिसू लागले, जॉन ॲडम्स व अलेक्झांडर हॅमिल्टन यांचा फेडरॉलेस्ट पक्ष व दुसरा जेफरसन यांचा डेमॉक्रट पक्ष. पहिला धनशक्तीचा व दुसरा लोकशक्तीचा उपासक होता. जेफरसनचा