पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
भारतीय लोकसत्ता

बंदुका, त्यांचीं जहानें, त्यांचे छापखाने हीं त्या निराळ्या विद्येचीं तर फलें नव्हेत ना, हे व या तऱ्हेचे हजारों प्रश्न, जे त्या काळच्या समाजनेत्यांच्या व इतरहि अनेक घटकांच्या चित्तांत प्रादुर्भूत व्हावयास हवे होते, ते येथें कधीं झालेच नाहींत. शिवछत्रपती व समर्थ रामदासस्वामी या दोन विभूति सोडल्या तर समाजजीवनाचे अनुभवप्रमाणानें चिंतन करणारी व्यक्ति या हजार वर्षाच्या इतिहासांत दिसतच नाहीं आणि जेथे समाजाच्या चालूं प्रपंचाचे व भवितव्याचे चिंतनच नाहीं तेथे त्या भवितव्याला वळण लावणाऱ्या संस्था निर्माण होण्याचा संभव कोठला ?

चिंतनाचा अभाव

 मागल्या काळांत या भूमींत कोणी चिंतनच करीत नव्हते, येथे तत्त्वमंथनच होत नव्हतें, याचा अर्थ असा कीं इतिहास, अनुभव, अवलोकन, तर्क यांच्या साह्याने कोणी चिंतन करीत नव्हते. या दृष्टीनें कोणी तत्त्वमंथन करीत नव्हते. नाहींतर भोवताली घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना पाहून प्रत्येक व्यक्तीच्या मनांत कांहीं तरी विचारचक्रे सुरू होतातच व आपल्या मगदुराप्रमाणे ती त्यांवरून कांहीं निष्कर्षहि काढीत असते. या तऱ्हेचे चिंतन व मनन ब्रिटिश पूर्वकाळांत येथे चालू होतें. येथे भिन्नभिन्न जातींच्या पंचायती व कधीं कधीं ब्रह्मवृंदांच्या सभाहि भरत असत. पण त्या पंचायती व त्या सभा जे निर्णय देत ते ठरीव चाकोरीच्या बाहेर कधी जात नसत. कांहीं आचारधर्मनियमांचा भंग झाला म्हणून समाज रसातळाला चालला आहे असा त्यांचा कायमचा निष्कर्ष असे. इतरहि विचारवेत्यांची ठरीवच विचारसरणी असे. 'सांप्रत विचार करतां हें युग विपरीत. तेव्हां दिवसेंदिवस धर्म क्षयास जाणार' असा सिद्धान्त पूर्वीच्यांनीं गृहीतच धरला होता. 'पुढे होणार भविष्य बलवंत. यास्तव नानासाहेबांस अशी बुद्धि झाली' अशा तऱ्हेची दैवाधीन विचारसरणी अवलंबूनच मागले लेखक घटनांची मीमांसा करीत असत. जे वाईट घडेल तें कलियुगामुळें, आणि चांगले होईल तें स्वामींच्या पुण्यप्रतापामुळे, हीच इतिहास मीमांसा त्यांना माहीत होती. तत्त्वमंथन किंवा चिंतन हे शब्द वापरतांना आपल्याला जो अर्थ अभिप्रेत असतो तो हा नव्हे. ब्रिटिश सत्ता येथे प्रस्थापित होऊन पाश्चात्यविद्येचा थोडाफार प्रसार झाल्याबरोबर पहिल्या