पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३७
मानवपुनर्घटना

उलट त्या वाढतच आहेत, असें अखिल भारतीय काँग्रेसकमिटीच्या निवडणुकांतील प्रकरणांवरून दिसून येतें.
 उपदेशाचा सौम्य मार्ग खुंटल्यानंतर दुसरा शिक्षेचा मार्ग उरतो. त्याने कदाचित् सुधारणा होईल, असे वाटतें; पण काँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा अजून अवलंब केलेला नाहीं. पंडितजींनी तसा धाक अनेक वेळां दाखविलेला आहे. जातीयवादी, स्वार्थी, पापभ्रष्ट, अधोगामी सभासदांना मी काँग्रेसमध्ये राहू देणार नाहीं, हाकलून लावीन, असे निकराचे उद्गार त्यांनी अनेक वेळां काढलेले आहेत. काळा बाजार करणाऱ्यांना तर फांशीं देण्याचीहि धमकी त्यांनी दिलेली आहे; पण प्रत्यक्षांत तसें त्यांनी कधीच केलेले नाहीं. उलट मद्रास, बंगाल येथील काँग्रेसच्या मंत्रीगणांचे भयंकर पापमार्ग त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर व त्यांना त्यांतील गुन्हेगारी पटल्यावरहि त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्षच केलेले आहे. याचे कारण काय ते नेमके सांगणे कठीण आहे; पण आभाळच फाटल्यानंतर टांका कोठे घालावा अशी बहुधा पंडितजींची स्थिति झाली असावी. काँग्रेसजनांच्या अधःपाताची, अनीतीची भ्रष्टतेची ही दुःखद कहाणी एका प्रदेशाची नसून भारतांतील प्रत्येक गांवाची, शहराची, तालुक्याची व जिल्ह्याची आहे. सरकारी खात्यांकडे पाहिले तरी तोच प्रकार आहे. अशा स्थितींत शिक्षा कोणाकोणाला करावयाची व हाकलून तरी कोणाकोणाला काढावयाचें ! अर्थात मनांत अनेक वेळां असे येते की प्रारंभी पापप्रवृत्ति दिसू लागतांच पंडितजीनी कठोरपणा धारण करून खरोखरच कांहीं मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना कडक शिक्षा केल्या असत्या, तर सर्वांनाच दशहत बसून या रोगाची लागण थांबली असती. पण प्रत्यक्ष त्या स्थानी असलेल्या माणसाला त्याच्या अडचणी माहीत असतात. त्यामुळे या बाबतींत तर्कवितर्क करण्यांत तथ्य नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे की, राष्ट्राच्या आत्म्याच्या ठायीं असलेली, राष्ट्राच्या उन्नतीची, बलसंवर्धनाची, विकासाची सर्व जबाबदारी जिच्या शिरावर आहे, अशी कॉंग्रेस ही एकमेव संस्था कमालीची अधोगामी झाली आहे आणि तिच्यांत सुधारणा होण्याची आशा तिच्या धुरंदर नेत्यांनाहि फारशी वाटत नाहीं. हे ध्यानांत घेऊन या विलक्षण आपत्तीच्या प्रसंगी आपल्या लोकशाहीच्या रक्षण संवर्धनाच्या दृष्टीनें भारताच्या नागरिकांनी कोणची योजना