पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३६
भारतीय लोकसत्ता

निवडून आलेले लोक मला मुळींच चालणार नाहीत. मी हा प्रकार मुळींच सहन करणार नाहीं. आज काँग्रेसजन जातीय व जमातीय भावना चेतवून आपली स्वतःची पोळी पिकवीत आहेत. ही वृत्ति त्यांनी टाकून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे आपसांतील चुरस, हेवेदावे हेहि बंद केले पाहिजेत. काँग्रेसला एक राष्ट्रीय संघटना म्हणून जगावयाचे असेल तर तिनें आपली धर्मातीत ध्येयवादी वृत्ति कायम ठेवली पाहिजे.' (भारतज्योति ७-१२-५२) पंडित नेहरूंच्याप्रमाणेच तंडनजी, विनोबाजी यांनी काँग्रेसच्या अधोगामी प्रवृत्तीवर टीका केली आहे आणि मध्यप्रांतांतील जनन्नाथप्रसाद शास्त्री यांच्यासारख्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या अनीतीचा इतका उबग आला आहे कीं, ते निराशेनें आत्महत्येचा मार्ग अनुसरीत आहेत.
 काँग्रेसमधील ही अनीति, हें पाप धुवून काढण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासून गेलीं पांचसहा वर्षे काँग्रेसचे पुढारी अखंडपणे करीत आहेत; पण त्याचा काडीइतकाहि उपयोग होत नाहीं, असें दिसते. प्रत्येक सभेंत, प्रत्येक बैठकींत, प्रत्येक परिषदेंत पटेल, नेहरू, राजेन्द्रबाबू, तंडनजी, पट्टाभि यांच्या भाषणांचा गेलीं पांचसहा वर्षे हा एकच सूर होता. 'ध्येयच्युत होऊं नका, स्वार्थाला बळी पडूं नका, क्षुद्र मोहाला वश होऊन राष्ट्रहिताचा बळी देऊं नका' असा काँग्रेसजनांच्या कानीं-कपाळी सारखा उपदेश ते करीत आहेत. पण त्यांचा हा उपदेश अरण्यरुदनासारखा ठरत आहे. सध्यां काँग्रेसच्या अनुयायांचें सत्त्वच ढळल्यासारखे झाले आहे. स्वार्थ, लोभ, मोह यांनीं ते अंध व पिसाट झाले आहेत. नेहरू, राजेन्द्रबाबू हे त्यांच्या लेखी आतां कोणी नाहींत. यामुळे या थोर धुरंधरांच्या तोंडी अनेक वेळां निराशेचे उद्गार आलेले दिसतात. अहमदाबादच्या भाषणांत नेहरू म्हणाले, 'काँग्रेसचा विनिपात होणार हें मला स्पष्ट दिसत आहे. सध्यां आपण केवळ बहुसंख्येच्या जोरावर देशाची विकलता झांकून ठेवीत आहोत. कसला तरी एक भयंकर रोग काँग्रेसच्या काळजाला झाला आहे व त्यामुळे ती आंतून सडत चालली आहे. आज काँग्रेसमध्ये चैतन्य उरलेले नाहीं व इतरांना ती चैतन्य देऊं शकत नाहीं.' (टाइम्स- ३०-१-५१) अशा तऱ्हेचे निराशेचे, कठोर, कानउघाडणीचे उद्गार गेली तीनचार वर्षे या थोर पुरुषांच्या तोंडून ऐकत असूनहि काँग्रेसजनांच्या पापप्रवृत्ति रतिमात्र कमी पडत नाहींत.