पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३५
मानवपुनर्घटना

हेहि आतां जनतेला माहीत झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेससमितीवर निवडून येण्यासाठी सध्यां कोणच्याहि पापमार्गाचा अवलंब करण्यास काँग्रेसजन भीत नाहींत. सभासदांची खोटी नोंद चालू आहे. मतासाठीं दारू व पैसा देण्यांत येत आहे. शेवटीं प्रतिपक्षाची टाळकीं फोडण्यासहि लोक कचरेनासे झाले आहेत. हैदराबादमध्ये असे प्रकार झाले त्यावरून पंडितजींनी नागपूरच्या एका भाषणांत फार कडक उद्गार काढले. 'अशा लोकांना कसलीहि दयामाया न दाखवतां मी काँग्रेसमधून हाकलून देईन' असे ते म्हणाले. 'सध्यां अनेक लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधिमंडळांत निवडून येणे हा धंदाच केलेला आहे. अशा प्रकारामुळेच काँग्रेस अपयशी झाली आहे; पण मग ते तिला योग्य शासनच झाले असे म्हटले पाहिजे.' असे निराशेचे उद्गार त्यांनी काढले. (भारत-ज्योति २-११-५२) निवडणुकीनंतर सत्ता हातांत आल्यावर राष्ट्राचे धन आपल्या सग्यासोयऱ्यांना वांटून देणे, निवडणुकीत ज्यांनी साह्य केले त्याची भर करणे हे प्रकार सर्व प्रदेशांत काँग्रेस करीत आहे. बिहारमध्ये ४०० एकर जमीन अशा तऱ्हेनें दिली गेली. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काँग्रेस सत्ताधरांनी एक समिति पण नेमली होती. (टाइम्स १२-११-५२) विघटना, दुफळी, अंतःकलह या रोगानें कॉंग्रेस किती नासली आहे व हा रोग नष्ट करण्याच्या बाबतीत पंडितजी, सरदार पटेल, राजेंद्रबाबू हे धुरीण कसे निराश झाले आहेत हे मागें 'राजकीय पुनर्घटना' या लेखांत दाखविलेच आहे. नित्याच्या सरकारी कारभारांत हस्तक्षेप करावयाचा व आपल्या वशिल्याच्या माणसांना नोकऱ्या द्यावयाच्या, कोणावर गुन्हेगारीसाठीं खटले झाले असल्यास ते काढून टाकावयास भाग पाडावयाचें, कंत्राटें आपल्या सग्यासोयऱ्यांना द्यावयाची ही प्रवृत्ति काँग्रेस पदाधिकाऱ्यांत किती प्रमाणांत आहे हें गोरावाला, राजाजी, काटजू यांनी अनेक वेळां दाखवून दिले आहे. त्याचा अहवाल सरकारनेच प्रसिद्ध केला आहे. मागें एकदां पंडितजी मुंबईला आले होते तेव्हां काँग्रेस कार्यकर्त्यापुढे त्याचें जें ६-१२-५२ रोजी भाषण झाले त्यांत त्यांनी काँग्रेसच्या नीतीवर थोडक्यांत हीच टीका केली. 'काँग्रेसच्या अधिवेशनाला अगदी कमी सभासद आले तरी चालतील; पण वाममार्गांनीं