पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३४
भारतीय लोकसत्ता

टाकण्यासाठींच दिवा जळत असतो. भोवतालच्या जनतेंत उच्च संस्कृतीचें संवर्धन करण्यासाठींच तिचा नेता स्वतः तनमनधनानें जळत रहातो. ते व्रत त्याने पाळल्यानंतर मग जनतेचा अधिक्षेप करण्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. एरवी नाहीं. जनता अधोगामी झाली हे काँग्रेसच्या अपयशाचें कारण नसून काँग्रेसची ध्येयच्युति ही जनतेच्या व राष्ट्राच्या अधःपाताचें कारण आहे.
 कल्याणी येथील काँग्रेसच्या अधिवेशनांत पंडित जवाहरलाल यांनी हाच महनीय विचार काँग्रेसजनांना ऐकविला. ते म्हणाले, की "गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाने माझ्या मनाची अशी निश्चिति झाली आहे कीं, आपण जनतेला योग्य तऱ्हेनें साद घातली तर ती उत्तम प्रतिसाद देते; पण जेथें प्रतिसाद मिळविण्यांत आपण अपयशी होतो तेथे दोष आपलाच असतो, जनतेचा नव्हे."
 काँग्रेस सध्यां किती पतित झाली आहे हेहि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत उद्वेगून वेळोवेळी जे उद्गार काढले आहेत त्यावरूनच दिसून येईल. जातीय संकुचित दृष्टि हा राष्ट्रीय जीवनांत फार मोठा रोग होय. या रोगानें कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार इ. अनेक प्रदेश ग्रस्त झालेले आहेत. उमेदवारांची निवड याच दृष्टीने होणार व मतदानहि याच चाकोरीतून जाणार हें ठरलेले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी रांची येथें पंडितजी गेले असतांना तेथें जातीयतेचा बुजबुजाट झालेला त्यांना दिसला. 'मी येथें आलो तो भारताच्या नागरिकांना भेटण्यास आलो होतो. रजपूत, भूमिहर, कायस्थ, अशा जातींना भेटावयास मी आलो नाहीं. येथें ही जातीयता बोकाळली आहे हे ऐकून मला फार दुःख झालें. जातीयवादी लोकांना मी काँग्रेसमधून हाकलून देईन' असे उद्गार त्यांनी तेथे काढले. (टाइम्स ऑफ इंडिया ३-१-५२) मद्रास प्रांतांत अनेक ठिकाणीं व आसाममध्येहि निवडणुकीत यश यावे म्हणून काँग्रेस अत्यंत जातीय व पाकिस्ताननिष्ठ अशा मुस्लीम लीगशीं प्रेमानें सहकार्य करीत आहे हे प्रसिद्धच आहे. काँग्रेसच्या श्रेष्ठ सत्ताधाऱ्यांनी त्या त्या स्थानिक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला; पण त्यांना कोणी भीक घालीत नाहीं