पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३३
मानवपुनर्घटना

रक्त येत नाहीं, असे दुःखाचे, निराशेचे उद्गार पंडितजींना काढावे लागतात. आणि जनतेचे सहकार्य मिळत नाहीं, तिच्या मनांत काँग्रेसविषयीं तिटकारा येत चालला आहे, असे शेकडो अधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगावे लागते. यांचें कारण एकच. भांडवल नाही, यंत्रे नाहीत, साधनसामुग्री नाहीं हें कारण नव्हे. जनतेच्या सहकार्यावर हक्क सांगण्याइतकी पुण्याई काँग्रेसजवळ शिल्लक नाहीं ! त्याची अपेक्षा करण्याइतकाहि अधिकार तिला सांभाळून ठेवतां आला नाहीं. काँग्रेसला अनेक भयंकर आपत्तींना तोंड द्यावयाचें होते हे खरे आहे. निर्वासितांचा प्रश्न, काश्मीरचें प्रकरण, संस्थानिकांचा प्रश्न, अन्नधान्याचा तुटवडा, दुष्काळ, टोळधाडी, महापूर, व्यापारी व भांडवलवाले यांचा स्वार्थ, कम्युनिस्ट लोकांचा दहशतवाद आणि स्टॅलिननिष्ठा या सर्व आपत्ति अत्यंत भयानक व दुस्तर होत्या व आहेत याविषयीं शंका नाहीं. पण काँग्रेसची शुद्ध ध्येयनिष्ठा जर अचल, अभंग राहिली असती तर या प्रश्नांचें, या आपत्तीचे स्वरूप फार सौम्य झालें असतें, त्यांतल्या कांहीं नाहींशा झाल्या असत्या व कांहीं उद्भवल्याच नसत्या. आज काँग्रेसचे अधिकारी पुष्कळ वेळां जनतेला टाकून बोलतात, लोक अत्यंत स्वार्थी आहेत, आळशी आहेत, त्यांना समाजहितबुद्धि नाहीं, त्यांची दृष्टि संकुचित आहे, त्यांची अभिरुचि हीन आहे, सत्य, संयम, विवेक या गुणांशी त्यांची ओळख नाहीं, आणि यामुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना यश येत नाहीं, असें भाष्य करतात. भारतीय जनता अशी आहे याबद्दल वादच नाहीं. सामाजिक निष्ठा, जनहितबुद्धि, संघटनेसाठी अवश्य असणारा विवेक या दृष्टीने आपण अगदी खालच्या पातळीवर आहो याबद्दल दुमत केव्हांहि नाहीं; पण स्वातंत्र्यापूर्वी जनता अशीच होती. नव्हे याहूनहि खालच्या पातळीवर होती. तशाहि स्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनीं व हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या ध्येयनिष्ठेमुळे तिला उच्च कार्याची प्रेरणा दिली. जनतेला अशी प्रेरणा देऊन तिला उच्च पातळीवर चढविणे हेच काँग्रेसचें कार्य आहे. जनता स्वार्थी आहे, आळशी आहे म्हणून आम्हांला यश येत नाहीं असे म्हणणे म्हणजे, अंधार काळा आहे म्हणून मला प्रकाशतां येत नाहीं, अशी दिव्याने तक्रार करण्यासारखे आहे. अंधाराला उजळून
 भा. लो.... २८