पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३२
भारतीय लोकसत्ता

जनतेचें तन मन धन या कार्यासाठी राबणें अवश्य होतें. हजारो सुशिक्षित तरुण, लक्षावधि शेतकरी व कामगार यांचे बौद्धिक व शारीरिक कष्ट, आणि कोट्यवधि जनतेचा मनोमन पाठिंबा यांची या कार्याच्या सिद्धतेला आवश्यकता होती. आपल्याजवळ भांडवल नाहीं, अन्नधान्य नाहीं, यंत्रे नाहींत, इतर साधनसामुग्री नाहीं; तज्ज्ञ लोक आपल्याकडे कमी, कसबी कामगार कमी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव कमी; अशा सर्व उणीवा होत्याच. पण त्या उणीवा कार्यसिद्धीच्या आड आल्या नसत्या. म्हणजे भांडवल किंवा साधनसामुग्री यांच्यावांचून कामें झाली असती असा भावार्थं नाहीं. तर त्या उणीवा भरून काढणे शक्य झाले असते. केव्हां? काँग्रेसची पुण्याई कमी झाली नसती तर, आपल्या राष्ट्राच्या कर्णधारांप्रमाणेच त्यांच्या नेतृत्वाने काम करणारे प्रांतोप्रांतींचे नेते आणि त्यांच्या शिस्तीत वागणारे जिल्ह्यांतले, तालुक्यांतले, शहरांतले, गांवांतले कार्यकर्ते हे त्यागी आहेत, निःस्वार्थी आहेत, आपल्या (म्हणजे जनतेच्या हितासाठी ते आहोरात्र कष्टत आहेत असा विश्वास जनतेच्या ठायीं निर्माण झाला असता तर अर्धपोटी राहून उन्हातानाची पर्वा न करतां, अपयशानें निराश न होतां, आपल्या राष्ट्रांतल्या कोट्यवधि सुशिक्षित अशिक्षित नागरिकांनी काँग्रेसशी हार्दिक सहकार्य केले असते. आणि मग इकडचे पर्वत तिकडे सहज फेकून देतां आले असते. आज काँग्रेसला भांडवलदाराचे दास्य पतकरावे लागले आहे असे आपण ऐकतों. पण हीहि गोष्ट सध्यांच्या स्थितीत अपरिहार्य म्हणून जनतेनें मान्य केली असती. काँग्रसचे मोठमोठे पदाधिकारी व हजारों कार्यकर्ते हे आपले आहेत, जनतेच्या हितावांचून त्यांना अन्य दृष्टि नाहीं ही खात्री जनतेला मनोमन पटली असती तर वाटेल त्या आपत्तीशी झुंज देण्यास ती सिद्ध झाली असती. भावी काळाच्या आशेच्या प्रेरणेने तिनें वर्तमानकाळाचे कष्ट, यातना, उपासमार सर्व कांहीं आनंदाने साहिले असते. इंग्रजांचे राज्य होतें तेव्हां हें दिसून आलें नाहीं काय ? तुरुंग, लाठीमार, गोळीबार, संसाराचा विध्वंस हे सर्व समोर दिसत असूनहि काँग्रेसशी सहकार्य करून आत्मबलिदान करण्यासहि लक्षावधि भारतीय पुढे आले. आतांच्या आपत्ति तुरुंग, गोळीबार त्यांच्या मानाने कांहींच नाहीत, कष्ट करून जे फल मिळवावयाचें तें पूर्वीसारखे दूरवरचें, अनिश्चित असेहि नाहीं. असे असूनहि, काँग्रेसमध्ये तरुण