पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३१
मानवपुनर्घटना

व आपण डोळ्यांनी जे चित्र नित्य पहात आहोत त्यावरून वस्तुस्थिति अशी झाली आहे याबद्दल कोणी वाद करील असे वाटत नाहीं. येथें मानवपुनर्घटनेशी त्याचा संबंध काय हे दाखवून आपणांस पुढे जावयाचे आहे.
 अगदी लहान अशा कुटुंबसंस्थेपासून राष्ट्र या व्यापक संस्थेपर्यंत सर्व संस्थांच्या इतिहासांतून असा एक नियम दिसून येतो की या संस्थांत ध्येयवादाने प्रेरित होऊन अहोरात्र तिच्या भवितव्याची काळजी करीत, यातना व कष्ट सोशीत, एखादी थोर व्यक्ति जेव्हां अखंड जळत रहाते तेव्हांच त्यांच्यांत जिवंतपणा टिकून राहतो. खोलीमध्ये एखादा दिवा जळत असला म्हणजे ज्याप्रमाणे भोवतालच्या अंधारांतला कणकण उजळून निघत असतो त्याप्रमाणे जेव्हां राष्ट्रांत एकादा महापुरुष ध्येयवादाच्या आगींत उभा राहून नित्य जळत रहातो तेव्हां इतरांच्या मनांतील हीन भाव नित्य उजळून निघतात व त्यांचे सात्त्विक गुणांत रूपांतर होत रहातें. ज्या संस्थेच्या नेतृत्वानें राष्ट्राचे कार्य चालू असते ती जोपर्यंत ध्येयवादानें प्रेरित झालेली असते, आपण केलेल्या कष्टाचे फळ राष्ट्राच्याच पदरीं पडणार आहे अशी तिच्या निःस्वार्थीपणामुळे जनतेची जोपर्यंत खात्री असते तोपर्यंत जनताहि ध्येयवादानें प्रेरित होऊन निःस्वार्थीपणे कष्ट करण्यास सिद्ध होते; आणि जनतेच्या या सहकार्यानेंच राष्ट्रीय प्रपंचाचा गाडा ओढणें शक्य होते. स्वातंत्र्याच्या पूर्वकालांत काँग्रेस ही अशी ध्येयवादानें प्रेरित झालेली संस्था होती आणि त्यामुळेच जनतेचें सहकार्य मिळविण्याचे सामर्थ्य व पुण्याई तिच्या ठायीं निर्माण झाली होती. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्यांत आत्मबलिदान करण्याइतके सहकार्य करण्याची प्रेरणा ती लक्षावधि लोकांच्या मनांत निर्माण करूं शकली. आपल्या ध्येयवादानें, निःस्वार्थीपणामुळे नित्य जळत रहाण्याच्या धैर्यामुळे अखिल जनतेचें सहकार्य प्राप्त करून घेण्याची जी पुण्याई तोच राष्ट्राचा आत्मा होय. ती पुण्याई, तो आत्मा आज नष्ट झाला आहे व त्यामुळे या देशाचें कलेवर होऊं पहात आहे.
 स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची आपल्याला पुनर्घटना करावयाची होती. ती केवळ काँग्रेसला आपल्याच संघटनेच्या बळावर करणे अशक्य होते.