पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३०
भारतीय लोकसत्ता

वाढलेच आहेत असे या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. सीनेटमध्ये निवडून येण्यासाठी मतें मिळवून दिलीं, किंवा प्रत्यक्ष पैसे दिले तरच या विद्यापीठांत परीक्षक नेमले जाते. कांहीं केवळ मॅट्रिक झालेल्या गृहस्थांना एम्. ए. चे परीक्षक नेमलें होतें. अधिकाऱ्यांच्या नात्यांतील विद्यार्थ्यांना पहिला वर्ग देण्याचे अमान्य केल्यामुळे कांहीं विद्वानांचे परीक्षापद गेले. अशा योजनेमुळे अगदीं रद्दी विद्यार्थ्यांना तेथे एम्. ए. च्या परीक्षेत सहज पहिला वर्ग मिळतो. आणि या सर्व प्रकारची दखल सरकार घेणार आहे म्हणून या विद्यापीठांचे अधिकारी सध्यां संतप्त झाले आहेत. (टाइम्स ऑफ इंडिया १९-११-५२) आपला एकंदर राज्यकारभार नीतीच्या दृष्टीनें कोणाच्या पातळीवर जाऊन बसला आहे याची यावरून सहन कल्पना येईल. हल्लीं मुळीं सर्वत्र असा नियमच झाला आहे की एखादें धरण बांधण्यासाठी, लोकांना कर्ज देण्यासाठी, सहकारी तत्त्वावर पुनर्रचना करण्यासाठी सरकारनें एखादें खाते किंवा संस्था स्थापिली कीं एक वर्षाच्या आंत तिच्या कारभारांतील वशिला, लांच, गोंधळ यांची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमावें लागतें !
 आपल्या देशाला सर्व दृष्टीनी असा जो विपरीत काळ प्राप्त झाला आहे त्याचे प्रधान कारण म्हणजे काँग्रेस या संस्थेचा अधःपात हे होय. या देशाच्या उन्नतीचें श्रेय जसे बव्हंशीं काँग्रेस या संस्थेलाच आहे त्याचप्रमाणे त्याच्या अधोगतीचेंहि खापर बव्हंशी तिच्याच माथी फुटणार अशी भवितव्यता दिसत आहे. शरीरांत हात, पाय, काळीज, फुफ्फुस, मेंदू, या सर्व अवयवांचे महत्त्व आपापल्यापरी आहेच. पण या सर्वांना संघटित करून, त्यांच्यांत प्राण भरून, त्यांचा कारभार एकसूत्री ठेवून सर्व शरीरांत एकत्व व तज्जन्य चैतन्य प्रस्थापित करण्याचे कार्य आत्मा करीत असतो. भारती राष्ट्र पुरुषाच्या देहांत हे कार्य काँग्रेस इतके दिवस करीत होती. त्याच्या आत्म्याच्या ठायीं स्वातंत्र्यपूर्व कालांत ही संस्था होती. तो आत्मा स्वातंत्र्यानंतर नष्ट झाला. आणि आतां या देशाची अवस्था एकाद्या कलेवरासारखी होऊन त्याची अंगें व उपांगें विघटित होऊं पहात आहेत. मागें राजकीय पुनर्घटना या लेखांत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राष्ट्राध्यक्ष राजेंद्रबाबू यांची जी अनेक वचनें उद्धृत केलेली आहेत