पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१
मानवत्वाची प्रतिष्ठा

धार्मिक, सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रांतल्या होत्या. त्यांना महत्त्व नाहीं असे नाहीं. त्यांचा विचार आपणांस करावयाचा आहेच. पण राजकारण हा लोकसत्तेचा गाभा असल्यामुळे त्याचें प्रवर्तन करणाऱ्या संस्थाचे महत्त्व जास्त आहे. आणि म्हणूनच त्यांचा निर्देश प्रथम केला आहे.
 ब्रिटिशांची सत्ता येथें प्रस्थापित होण्यापूर्वी हजार वर्षांच्या काळांत अशा प्रकारच्या संस्था आपल्या देशांत केव्हांच निर्माण झाल्या नव्हत्या आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे या अर्वाचीन संस्था स्थापन करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनापुढे जे ध्येय होते त्या ध्येयाने या देशांत मागल्या काळांत कोणतेच लोक प्रेरित झालेले नव्हते. समाजाच्या उत्कर्षापकर्षाचें चिंतन करावे, त्याच्या भवितव्याची चिंता वहावी, घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यांवरून कांहीं निष्कर्ष काढावे आणि त्याअन्वये समाजाची नवी घडी बसवावी हा जो समाजांतील तत्त्ववेत्त्यांचा प्रधान उद्योग तो या भरतभूमींत प्रायः लुप्तच झाला होता. आपल्या भूमीवर शेकडों वर्षे आक्रमणे कां होत आहेत, तीं मारून काढण्याचे पूर्वीसारखें सामर्थ्य आपल्या अंगीं कां नाहीं, आपली समाजरचनाच कांहीं बिघडली आहे काय, चातुर्वर्ण्य, जातिभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता यांचा याच्याशी कांहीं संबंध आहे काय, ही भूमि सुवर्णभूमि असूनहि येथे कायमची अन्नान्नदशा कां असावी, परकीय व्यापारी येथे येऊन येथून अमाप धन घेऊन जातात याचा अर्थ काय, हे कोण आहेत, कोठून येतात, यांचे व्यापार व कारभार सुयंत्रपणें चालविणारी यांच्यामागें कोणची शक्ति आहे, ती शक्ति त्यांच्या समाजरचनेचेंच विशिष्ट फल आहे काय, आपण आपला धर्म सर्वश्रेष्ठ समजतो ते बरोबर आहे काय, त्यांतील संन्यासप्रवृत्ति, आचारकांड व शब्दप्रामाण्य यांनीं आपला घात तर केला नाहींना, तसें असेल तर आपल्या धर्मात कोणच्या सुधारणा करणे अवश्य आहे, आपल्या समाजांत स्त्रीचें जे स्थान आहे ते आपल्या समाजाच्या कल्याणाला बाधक नाहीं काय, बालविवाह, असंमत वैधव्य इ. रूढी स्त्रीच्या जीवनाच्या परिणतीच्या आड येत नाहींत काय, आपण जी विद्या आपल्या समाजांत आहे असे म्हणत तिची खरोखरी काय किंमत आहे, विद्या या नांवाला तरी ती पात्र आहे काय, त्याहून पाश्चात्य विद्या कांहीं निराळ्या प्रकारची आहे काय, त्यांच्या