पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२८
भारतीय लोकसत्ता

 आपल्या कार्यक्षमतेचें स्वरूप न्याहाळल्यानंतर आतां आपल्या नीतिमत्तेचे रूप पहावयाचे आहे. कार्यक्षमता व नीतिमत्ता हीं राष्ट्रपुरुषाची दोन फुफ्फुसे आहेत. त्यांतून त्याचे श्वसन चालते. यांपैकी एक जरी कार्य करीत राहिले तरी प्राण राहूं शकतो. सतराव्या शतकांतील ब्रिटनच्या राज्यकारभाराचें 'अत्यंत अधोगामी पण अत्यंत कार्यक्षम' असें इतिहासकार वर्णन करतात. म्हणजे एकाच फुफ्फुसावर तेथला कारभार चालला होता. पण तेवढ्यावर परमोत्कर्ष साधला नाहीं तरी अनेक संकटांतून ब्रिटन पार पडलें. पण जेथें दोन्ही फुफ्फुसें बिघडली आहेत तेथें अशी आशा धरतां येईल काय ?
 आपल्या देशाच्या सार्वजनिक जीवनांतील नीतिमत्तेचे सध्यां संपूर्ण दिवाळे निघालेले आहे याबद्दल आतां दुमत होईल असे वाटत नाहीं. राजकीय पुनर्घटना व औद्योगिक पुनर्घटना या प्रकरणांत विषयाच्या अनुषंगानें काँग्रेसची संघटना, व्यापारी वर्ग व एकंदर समाज यांच्यातील कमालीच्या अनीतीचे वर्णन केलेच आहे. विषयाच्या पूर्ततेसाठी आपला एकंदर राज्यकारभारहि अनीतीच्या रोगानें कसा सडून गेला आहे याची माहिती येथें देतो. ही माहिती सरकारी अहवालांतूनच घेतलेली आहे. आपल्या सरकारी खात्यांत एकहि खाते असें नाहीं कीं जे या रोगापासून मुक्त आहे. (१) हिंदुस्थानचे अकाउंटंट जनरल आपल्या सर्व परदेशी वकिलातीतून हिंडून आले व त्यांनी आपला अहवाल सरकारला सादर केला. त्यांत त्यांनी सांगितले आहे की या वकिलातीत सर्वत्र उधळेपणाचा कारभार आहे. पैशाचा हिशेब एकाहि वकिलातीत समाधानकारक ठेवलेला नाहीं. (सकाळ. २८-१०-५१) इंग्लंडमध्ये खरेदी केलेल्या जीपगाड्यांचे प्रकरण सुप्रसिद्धच आहे. या वकिलाती परदेशी कंपन्यांशी करार करतात, तेहि सावधगिरीनें केलेले नसतात. कराराचा भंग झाला तर त्यासाठी कंपनीला जबाबदार धरता येईल अशी तरतूदच कांहीं करारांत केली नव्हती. अर्थात् यांतील हेतु उघड आहे. (२) उत्तर प्रदेशांतील स्थानिक स्वराज्यांची नुकतीच तपासणी झाली. तिच्या अहवालांत पुढीलप्रमाणे माहिती मिळते. बनारस, कानपूर, लखनौ, मुझफरपूर, झांशी, डेहराडून, इटावा या म्युनिसिपालिट्यांनीं नियमाप्रमाणे हिशेब ठेवलेला नाहीं.