पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२५
मानवपुनर्घटना

अपयश हें साधनांच्या अपुरेपणांत नाहीं. खरे वैगुण्य म्हणजे एकसूत्रता, सुसंगति, परस्पर अन्वय यांचा अभाव हे आहे. आणि धनसाधनें वाढली तरी त्यांचे भवितव्य बदलणार नाहीं. प्रत्येक पायरीगणिक सुसूत्रता, सुबद्धता, एकात्मता आणली तरच या फलद्रूप होतील.'
 डॉ. ग्यानचंद यांचें हें निवेदन व त्यांची टीका पूर्णपणें यथार्थ कशी आहे हे 'शिंदरी फर्टीलायझर फॅक्टरी' च्या गाजलेल्या इतिहासावरून कळून येईल. हाहि इतिहास सरकारने नेमलेल्या 'एस्टिमेट कमिटीनें' च लोकांपुढे मांडला आहे. आपल्या राज्यकारभाराचें निःस्पृह पंडितांकडून मापन करवून घेऊन त्या मापनांत कितीहि कठोर व जहरी टीका केलेली असली तरी ते स्वतःच प्रसिद्ध करून जनतेपुढे मांडण्याचें जें अत्यंत प्रांजल धोरण नेहरू सरकारेंन अवलंबिले आहे व ग्यानचंद, गोरावाला, एस्टिमेट कमिटी यांच्या इतिवृत्तांवरून ज्याचे प्रत्यंतर येत आहे, त्या धोरणासाठी आपल्या सरकारला जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत. सरकारविरुद्ध कोणी टीका करतांच किंवा तसा विचार कोणाच्या मनांत आला असेल अशी शंका येतांच सोव्हिएट रशियांत त्या मनुष्याला गोळी घालतात. आणि भारताचे सूत्रधार पंडितजी मुद्दाम निःस्पृह अशा पंडितांना निमंत्रण देऊन त्यांनी केलेली टीका प्रांजलपणे जनतेपुढे मांडतात. हे पाहून भारतीय प्रजासत्ताकाच्या भवितव्याविषयीं निर्माण होत चाललेली निराशा क्षणभर तरी कमी होते यांत शंका नाहीं. असो. एस्टिमेट कमिटीनें शिंदरी फॅक्टरीबद्दल काय सांगितले ते आपणांस पहावयाचे आहे.
 या कारखान्याच्या उभारणीचा खर्च प्रथम अंदाजाने सुमारें ११ कोटी धरलेला होता. पुढे १२ कोटीची मागणी करण्यांत आली व त्यानंतर १५, १८, २३ अशी ती सारखी वाढविण्यांत आली व अजूनहि ही रक्कम पुरेशी होईल अशी खात्री नाहीं. असें का व्हावे याविषय चवकशी झाली तेव्हां पुढील गोष्टी उघडकीस आल्या. उद्योग व पुरवठा या खात्याच्या अधिकाऱ्यांनीच कमिटीपुढे साक्ष देतांना सांगितले की, या योजनेच्या खर्चाचें अंदाजपत्रक केलेलेच नव्हतें ! साधारण आंकडा सांगितला होता. तसेंच या योजनेवर नियंत्रण असे कोणाचेंच नव्हते. अर्थमंत्री यांनीं