पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२२
भारतीय लोकसत्ता

तेरा कोटि रुपये झाला आहे. १९४९ पर्यंत एकंदर सर्व प्रांतांचा विकासखर्च २२९ कोटी झाला यांतील ५६ कोटी म्हणजे एक चतुर्थांश खर्च इमारती व रस्ते याकरतांच झाला आहे. हे ग्यानचंद यांच्या मतें अगदीं असमर्थनीय आहे. आसाम व मुंबई या प्रांतांत मोठे कारखाने निघणे अत्यंत अवश्य होते. पण या प्रांतांत त्यांच्या योजना सुद्धां नाहींत. पाटबंधाऱ्यावर सर्वात जास्त खर्च मध्यप्रदेशांत होणे अवश्य होते. कारण नांगरटीखाली येण्याजोगी पण पडीत जमीन तेथे सर्वात जास्त आहे. पण त्याच प्रांतांत सर्वांत कमी खर्च झाला आहे. (प्रॉव्हिन्शियल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम- ग्यानचंद- गव्हमेंट ऑफ इंडिया १९४९. पृ. १७३ ते १८९) हे सर्व सांगून डॉ. ग्यानचंद म्हणतात की, या सर्व कार्यक्रमांत एकसूत्रता अशी नाहींच. एका प्रांताचा दुसऱ्या प्रांताशी संबंध नाहीं. आणि अखिल भारताचे समग्र दर्शन तर योजनेंत कोणालाच नव्हते. प्रत्येक प्रांताला पैशाचा विशिष्ट वांटा मिळाला होता. आणि प्रत्येक प्रांत तो परस्परनिरपेक्ष खर्च करीत होता. कोणाचा कोणाला मेळ नव्हता. पंडित नेहरूंनी वरील पुस्तकाच्या प्रस्तावनेत तर आणखी पुढे जाऊन म्हटले आहे की भिन्नभिन्न प्रांतांचा एकमेकांशीं मेळ नाहीं इतकेच नव्हे, तर प्रांतांतल्या एका खात्याचा दुसऱ्या खात्यांशी मेळ नाहीं. आणि पुढे कांहीं उदाहरणे देण्यांत येतील त्यावरून असें दिसेल कीं, एका कारखान्यांत किंवा एका संस्थेतहि एका विभागाचा दुसऱ्याशी मेळ नसतो ! भारताचा प्रचंड विस्तार व विपुल सुप्त संपत्ति पाहून अभिमानाची भाषणे करणे सोपे आहे. पण या अफाट पसाऱ्यांतील अनंत घटकांना एकसूत्रबद्ध करून या अनंत घटकांतून एक भारतमूर्ति निर्माण करणे अत्यंत दुष्कर आहे. तसें झाल्यावांचून आपले स्वातंत्र्य टिकणेंसुद्धां शक्य नाहीं. मग भारतीय समाजाचे संघटित राष्ट्र बनविणे आणि तें राष्ट्र लोकायत्त करणे हे तर सुतराम् अशक्य आहे. भारतीय राष्ट्रपुरुष असें आपण बोलतांना बोलतों. पण पुरुषाच्या प्रत्येक हालचालींत, बोलण्यांत, विचारांत आणि सर्व जीवनांत जी एकसूत्रता असते-- जी नसेल तर मनुष्याला मनुष्यत्वच येणार नाहीं-- ती एकसूत्रता भारतीय पुरुषाच्या अंगी आल्यावांचून त्याला राष्ट्रपुरुष कसें म्हणतां येईल ? ती एकसूत्रता आणणे हे आत्म्याचें कार्य आहे. तसा आत्मा भारताला अजून निर्माण