पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
भारतीय लोकसत्ता

खरोखर समाजशरीराच्या मुख्य घटक असतात. त्यांतील फुटीर व्यक्ति या नव्हेत. आपले शरीर हें उत्तम सहकार्याचे एक अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. समस्त जीवनाच्या उन्नतिअवनतीची जबाबदारी त्यांतील प्रत्येक घटकावर आहे आणि एका घटकाचे सुखदुःख तेंच प्रत्येक घटकाचे सुखदु:ख आहे असा सक्त दण्डक असल्याचें दुसरें इतके चांगले उदाहरण सांपडणे फार कठीण आहे. अशा या शरीराचे आद्य घटक फुटीर असे मांसकण हे नसून त्या मांसाच्या किंवा जीवनरसाच्या बनलेल्या पेशी हे होत, पेशी विघटित झाल्या तर रक्तमांसाचे कण विद्यमान असूनहि शरीरव्यापार चालणार नाहींत. शरीरांत हें जें पेशींचे स्थान आहे तेच समाजांत संस्थांचे आहे. या संस्था मुळांतच नसल्या किंवा असून विघटित झाल्या तर, संस्थांचे कण म्हणजे ज्या व्यक्ति त्या जरी अस्तित्वांत असल्या तरी समाजाचे जीवन हे चालू शकणार नाहीं; ते स्थगित होईल, कुंठित होईल व अंतीं विनाश पावेल.

संस्थांचा जन्म

 गेल्या शतकांतील लोकशाहीच्या सिद्धतेचे पहिले लक्षण म्हणजे सार्वजनिक जीवन निर्माण करणाऱ्या अशा संस्थांचा जन्म हें होय. २६ ऑगस्ट १८५२ रोजी मुंबईला 'बॉम्बे असोसिएशन' नांवाची संस्था स्थापन झाली. पितामह दादाभाई, जगन्नाथ शंकरशेट, डॉ. भाऊ दाजी या मंडळींनी ही संस्था स्थापून हिंदुस्थानच्या अर्वाचीन राजकारणाचा पाया घातला. याच सुमारास बंगालमध्ये प्रसन्नकुमार ठाकूर, राजेंद्रलाल मित्र, हरिश्चंद्र मुकर्जी इ. कार्यकर्त्यांनी अशीच 'ब्रिटिश इंडिया असोसिएशन' नांवाची संस्था स्थापन केली होती आणि मद्रासमध्येहि 'मद्रास नेटिव्ह असोसिएशन' ही संस्था याच वेळीं उदयास आली होती.
 लोकशाही हे जे सामुदायिक जीवन आहे त्याला धार्मिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशी विविध अंगे अत्यंत अवश्य असली तरी प्रधानतः ते राजकीय जीवन आहे आणि म्हणूनच वर प्रथम राजकारणी संस्थांचा उल्लेख केला आहे. १८५० च्या आधीं सार्वजनिक जीवनाचे लक्षण म्हणजे ज्या संस्था त्या आपल्या भूमींत अस्तित्वांत आल्या होत्या; पण त्या