पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१८
भारतीय लोकसत्ता

मानव पुनर्घटनेचे जे सर्वात महत्त्वाचें कार्य त्याचा विचार करून भारतीय लोकसत्तेचें हे विवेचन पुरे करावयाचे आहे.
 कोणच्याहि समाजाच्या उत्कर्षाला जी अनेक प्रकारची धने अवश्य असतात, त्यांत 'मानवधन' हें सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. सुपीक जमीन, अरण्यें, खाणी, नद्या, बंदरें, समुद्रकिनारा, व्यापार, कारखानदारी इ. सर्व धनें आपापल्या परी अवश्य व महत्त्वाची आहेतच. पण विवेक, त्याग, कर्तृत्व, दूरदृष्टि, बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य तेजस्वी व अभिमानी वृत्ति, उदात्त ध्येयवाद इ. गुणांनी संपन्न असलेला मानव हें कोणत्याहि राष्ट्राचें खरें धन होय. हे धन असल्यावर इतर धने नसली तरी निर्माण करतां येतात किंवा बाहेरून मिळवितां येतात. पण हें धन नसेल तर इतर धनें असून नसल्यासारखीं होतात. ती असली तरी त्यांची माती होते, किंवा इतर देशांतल्या लोकांना त्यांचा उपयोग होऊन स्वदेशाला ती जास्तच घातक ठरतात. इतर देशांतल्या कोणच्याहि लोकशाहीचा आपण अभ्यास केला तर यशःसिद्धि ही भोवतालच्या परिस्थितीवर फार थोडी अवलंबून असून मानवाचें मन, बुद्धि, अंतःकरण यांचे जे गुण त्यांवर ती बव्हंशी अवलंबून असते हें आपल्या ध्यानांत येईल. क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे । या कविवचनाचा भावार्थ हाच आहे. इंग्लंडमध्ये राजसत्तेवर नियंत्रण घालण्यांत आले व लोक संघटित लोकशाहीचा मार्ग यशस्वीपणे क्रमूं लागले. त्याचवेळी जर्मनी, फ्रान्स, पोलंड, स्पेन, इटली येथेंहि त्याच दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या देशांच्या भौतिक परिस्थितीत त्याकाळीं तरी म्हणण्यासारखा फरक नव्हता. असे असूनहि त्यांना यश आले नाहीं. इंग्लंड पूर्ण यशस्वी झालें, फ्रान्स व जर्मनी कांही दृष्टींनीं यशस्वी झाले. पण इटली, स्पेन व पोलंड यांना यशाचे दर्शनहि झाले नाहीं. उलट त्यांचा कमालीचा अधःपात झाला. याला कारण एकच. तेथला मानव हा नव्या जबाबदाऱ्या पेलण्यास असमर्थ ठरला. ते ते समाज रसातळास गेले ते यामुळे. पूर्वीच्या काळी युरोपांत ग्रीसचा उदय झाला. गेल्या शतकाच्या अखेरीस पूर्वेकडे जपानचा उदय झाला. त्यावेळी ग्रीस किंवा जपान यांच्या भोवतालच्या देशांतील परिस्थिति त्यांच्यापेक्षा निराळी होती असे नाहीं. भौतिक परिस्थिति जवळ जवळ तीच होती. तरी ग्रीक