पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१९
मानवपुनर्घटना

व जपानी मानवानें आपल्या अंतरांतील त्याग, विवेक, कष्ट करण्याची व यातना सोसण्याची सिद्धता, उच्च आकांक्षांसाठी वाटेल ती किंमत देण्याची मनाची तयारी इ. अनेक प्रकारचें धन दोन्ही हातांनी उपसून बाहेर काढले व आपला उत्कर्ष करून घेतला. इतर आवतीभवतींचे समाज कशांत उणें पडले असतील तर ते या आंतरिक धनाच्या बाबतींत. याचा अर्थ असा की, राष्ट्राच्या उन्नतीच्या बाबतीत निर्णायक ठरणारे धन म्हणजे मानवधन होय. भारताच्या इतिहासांतील फार प्राचीन काळांतील महर्षि व्यास यांच्यापासून भारताचे आजचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापर्यंत हे एकच महातत्त्व येथले थोर पुरुष भारतीयांना सांगत आहेत. विवेक, त्याग, धैर्य, प्रज्ञा, निष्ठा या मानवी सद्गुणांचे संवर्धन करा. प्रारंभी दिलेल्या अवतरणांचा हाच भावार्थ आहे. पन्हाळा किंवा सिंहगड हे खरे किल्ले नव्हत. बाजीप्रभु, तानाजी मालुसरे हे खरे किल्ले होत. शिवछत्रपतींचें, मराठी राज्याचें रक्षण त्यांनी केले. हे दुर्भेद्य नरदुर्ग हाच खरा राष्ट्राचा आधार होय. भेदनीतीला ते वश झाले, त्यांची निष्ठा चळली, त्यांचा विवेक सुटला की दगडाचे किल्ले कांहींच करूं शकत नाहींत. ते शत्रूलाच साह्यभूत होतात. म्हणून नरदुर्ग सर्वात श्रेष्ठ असे महाभारतकारांनी सांगून ठेविले आहे. पंडित जवाहरलाल आज तेंच सांगत आहेत. नवें राष्ट्र घडावयाचें तर नवी मानवमूर्ति प्रथम घडली पाहिजे. मग आपल्याला दुष्कर असें कांहीं नाहीं. मानवधन हे खरें धन होय. इतर धनें गौण होत.
 मानव पुनर्घटना याचा अर्थ आतां सहज ध्यानांत येईल. अविवेक, अंधनिष्ठा, विघटनावृत्ति, स्वार्थ, मोह, दैववाद इ. भारतीयांच्या अंगचे दुर्गुण नष्ट करून त्यांच्या ठायीं त्याग, विवेक, धैर्य, ध्येयनिष्ठा इ. सद्गुणांचे संवर्धन करणे म्हणजेच पुनर्घटना. ही पुनर्घटना आहे असे म्हणण्याचे कारण असे कीं वरील सर्व आंतरिक धन हे मानवाच्या स्वाधीनचें आहे. ते त्याच्या ठायीं आजच आहे. ते कोठून बाहेरून प्राप्त करून घ्यावयाचें नाहीं. आनुवंश, भौगोलिक परिस्थिति, अर्थव्यवस्था, यांवरहि तें अवलंबून नाहीं, ते धन सर्वस्वी स्वाधीन आहे. आपल्या मनाची घडण फक्त बदलावयाची आहे. अवश्य ते घटक तेथेंच इकडे तिकडे पडलेले आहेत. ते घेऊन, जुने काढून टाकून, रचना फक्त नवीन करावयाची