पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकरण पंधरावें


मानवपुनर्घटना



दुर्गेषु च महाराज षट्सु ये शास्त्रनिश्चिताः ।
सर्व दुर्गेषु मन्यन्ते नरदुर्ग सुदुर्गमम् ॥

महाभारत, शांतिपर्व अध्याय ५५- ३५

 "शास्त्रांच्या विषयांत ज्यांची मति निश्चित झाली आहे ते पंडित असे सांगतात की, राज्यरक्षणासाठी जे सहा प्रकारचे दुर्ग म्हणजे किल्ले अवश्य असतात त्यांत नरदुर्ग हा सर्वात दुर्भेद्य असा दुर्ग होय. [अनन्यनिष्ठ राजसेवक हाच खरा राज्याचा आधार होय.]"
 "अनेक लोक धनाची महती गातात; आणि धनाचा उपयोग असतो यांत शंका नाहीं. पण अंतिम यशापयश हें मानवावरच अवलंबून असते. इतिहास हा मानवानें घडविला आहे. आणि मानवजातीची प्रगति झाली ती मानवाच्या कर्तृत्वामुळे झालेली आहे; धनामुळे नव्हे. शिक्षणानें, संस्काराने आपण भारतांत जर इष्ट ती मानवमूर्ति घडवूं शकलो तर बाकीचें कार्य अत्यंत सुसाध्य आहे" -पंडित जवाहरलाल नेहरु– (कुरुक्षेत्र खास अंक— २ ऑक्टोबर १९५३)
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण येथे जे लोकसत्ताक शासन स्थापन केले ते यशस्वी करण्यासाठी आपल्या जीवनाची सर्वांगीण पुनर्घटना करणे अवश्य आहे हा विचार सांगून त्या पुनर्घटनेची दिशा कोणची, मार्ग कोणचे, महत्त्व किती या सर्वांचे विवेचन गेल्या कांहीं प्रकरणांतून केले. राजकीय, आर्थिक व सामाजिक या तीन अंगांची पुनर्घटना करण्यासाठी काँग्रेस सरकारने कोणचे प्रयत्न केले व त्यांचे फळ काय मिळाले याचा कांहींसा आढावाहि त्या लेखांत आपण घेतला. आतां आपल्या लोकशाहीच्या यशाच्या दृष्टीने
 भा. लो.... २७