पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१६
भारतीय लोकसत्ता

 लूथरच्या धर्मसुधारणेनंतर पश्चिम युरोपांतील देशांत कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे दोन तट पडले. आणि जवळ जवळ प्रत्येक देशांत भयंकर यादवी युद्धे झाली. यांतून मुक्त राहिले असे फक्त ब्रिटन. प्रोटेस्टंट इंग्लंडचा संपूर्ण नाश करण्यासाठीं पोपच्या प्रेरणेनें स्पेनच्या कॅथॉलिक राजानें इंग्लंडवर आरमाडा धाडला होता. म्हणजे ते युद्ध कॅथॉलिक व प्रोटेस्टंट या तत्त्वावर होणार होतें. अशा वेळी कॅथॉलिक शत्रूला तोंड देण्यासाठी उभारलेल्या सेनेचें आधिपत्य इंग्लंडनें एका कॅथॉलिक सेनापतीकडेच दिले होतें. आपल्या लोकांच्या धर्मातीत राष्ट्रीय निष्ठेवर इंग्लिश जनतेचा इतका विश्वास होता. अशा तऱ्हेचा विश्वास आज हिंदुमुसलमानांचा परस्परांवर नाहीं. तो निर्माण झाल्यावांचून या दोन समाजांची संघटना होणे अशक्य आहे. वर सांगितलेलीं मन्वंतरें मुस्लीम समाजांत घडून येणे या गोष्टीमुळे याची केवळ पूर्व तयारी होईल. भविष्यकालांत होणाऱ्या अनेक संग्रामांत या भूमीच्या संरक्षणार्थ, तिच्या उत्कर्षासाठी, तिच्या जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी, तिच्या अनंतविध समस्या सोडविण्यासाठी हे दोन्ही समाज सारख्याच आत्मीयतेने सहभागी होतील, शरीर झिजवितील, यातना भोगतील, रक्त सांडतील, आत्मबलिदान करतील, त्याच वेळी त्यांची एकमेकांविषयींची साशंकता नष्ट होईल व भारतीय समाज एकजीव होईल. हे सर्व घडवून आणणे येथील भारतनिष्ठ मुस्लीम नेत्यांच्या हाती आहे. केमालपाशाच्या धैर्यानें त्यांनीं स्वबांधवांना धर्मयुगांतून विज्ञानयुगांत आणून सोडले तरच हिंदु व मुसलमान या दोन समाजांचें एक राष्ट्र घडून येईल.