पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१५
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

ते संघटित होण्याची शक्यता आहे, अशी आशा या घटनेवरून वाटते. खान अबदुल गफरखान यांची 'खुदा ई खिदमतगार' ही संघटना म्हणजे अशाच प्रकारचा एक आशेचा किरण होता. आज वायव्य प्रांत हा पाकिस्तानांत समाविष्ट झाल्यामुळे त्याचें फारसे व्यावहारिक महत्त्व नाहीं. पण तात्त्विक दृष्ट्या त्याला अजूनहि महत्त्व आहे. धर्मातीत राष्ट्रीय दृष्टि कडव्या पठाण जमातीतहि निर्माण होऊ शकते, याचा तो पुरावा आहे. काश्मीर, वायव्य प्रांत या प्रदेशांत जे झाले ते भारताच्या इतर भागांतहि होण्याची शक्यता आहे, असें तात्त्विक दृष्टीने तरी म्हणावयास हरकत नाहीं. कलकत्याचे रेझा ऊल करीम, मुंबईचे अकबरअल्ली मिर्झा यांसारख्या कांहीं पंडितांना परंपरेच्या अभिमानाचे महत्त्वाह पटले आहे असे दिसते. 'पाकिस्तान एक्झॅमिन्ड' या आपल्या पुस्तकांत रेझा ऊल करीम म्हणतात -
 'मुसलमानांना अनेक शतके या भूमीनें पोसले आहे. त्यांचा आतां अरबस्तान, इराण या देशांशी कांहींएक संबंध नाहीं. आतां हिंदुस्थान हीच आमची मातृभूमि आहे. वेद, उपनिषदें, रामायण, महाभारत ही माझीच धनदौलत आहे. रामसीता, अशोक, अकबर, कालिदास, अमीर खुश्रू ही माझी थोर परंपरा आहे. हिच्यापासून मला कोणीहि तोडून काढू शकणार नाही. तिच्यांत कांहीं दोष असतीलहि; पण ती माझी म्हणूनच मला प्रिय आहे. मुसलमानांनी ही वृत्ति दाखविली तर हिंदू तर काय आपल्या परंपरेंत सर्व थोर विभूति समाविष्ट करून घेण्यास एका पायावर तयार आहेत. आर्य, अनार्य, द्रवीड, दास, दस्यु, आदिवासी या सर्वांच्या परंपरा एकजीव करून टाकूनच आतांपर्यंतचे वैभव भारतीयांनीं विकसित केले आहे. दशावतार, विष्णुसहस्रनाम, गीतेंतील विभूतियोगाचा अध्याय, लग्नांतील गोंधळ-प्रसंगीचें देवताआवाहन, पंचायतनपूजा, हीं सर्व हिंदूंच्या या वृत्तीची लक्षणे आहेत. अर्वाचीन काळांतहि कृष्णकरीम, रामरहीम हा जयघोष त्याच वृत्तींतून उद्भवलेला आहे; पण याच्या बुडाशी असलेली व्यापक, उदार, धर्मांतीत दृष्टि आमच्या मुस्लीम बांधवांत निर्माण होत नाहीं, हीच काय ती उणीव आहे आणि त्यामुळेच ही समस्या बिकट होऊन बसली आहे.