पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१३
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

भांडवलदार आणि जमीनदार व मुसलमान भांडवलदार व जमीनदार यांना आम्ही समान लेखीत नसून हिंदू धनिकांना दूरचे लेखतो व मुसलमान धनिकांना आपले मानतो, हे स्पष्ट केलें. हिंदुकामगारांविषयी स्ववर्गीय म्हणून त्यांना जिव्हाळा वाटला नाहीं; मुसलमान धनिकांविषयीं स्वधर्मीय म्हणून आपलेपणा वाटला ही गोष्ट सर्व कामगार एकजात लीगच्या मागें उभे राहिले यावरून सिद्ध झाली. आचार्य जावडेकर हे एकांतिक मार्क्सवादी नाहींत. पण त्यांनी सुद्धां म्हटले आहे की, 'हिंदुस्थानचे अखंडत्व हें धर्मातीत राष्ट्रीय वृत्तीवर अवलंबून आहे. व ही धर्मातीत राष्ट्रीय वृत्ति मध्यमवर्गापेक्षां किंवा वरिष्ठवर्गापेक्षां कनिष्ठ शेतकरीकामकरी वर्गात जागृत होणें व टिकणें अधिक सुलभ आहे.' (हिंदु-मुसलमान ऐक्य. पृ. १६२) असें आचार्यांनी कां म्हणावे हे ध्यानांत येत नाहीं. गांधीपंथांत एकंदरच अज्ञानाविषयी जास्त प्रेम आहे ते येथे प्रभावी झाले असावे असे वाटते. एरवीं आचार्यांनी असे लिहिले नसते. कारण धर्मातीत मनोवृत्तीचा संबंध प्राधान्यानें बुद्धिप्रामाण्य, विवेकनिष्ठा यांच्याशी असतो. आणि इतिहास, तत्त्वज्ञान, भिन्न भिन्न विज्ञानशाखा यांच्या अभ्यासानें बुद्धिप्रामाण्य निर्माण होतें. युरोपांत विज्ञानाची जेव्हां प्रगति झाली तेव्हांच धर्मातीत राष्ट्रीय वृति निर्माण झाली. आणि ती प्रथम विद्यासंपन्न मध्यमवर्गात व वरिष्ठ वर्गातच झाली. शेतकरी कामकरी वर्गात प्रथम विज्ञान पसरलें तेव्हांच हे लोण तेथपर्यंत पोचलें. आचार्यांनी अन्यत्र रेनेसान्स, रेफर्मेशन, रेव्होल्यूशन यांची महती मान्य केली आहे. पण येथें त्यांचा दृष्टिकोन मार्क्सप्रणीत आर्थिक तत्त्वज्ञानानें झाकोळल्यासारखा दिसतो.
 असो, तात्पर्यार्थ असा कीं, हिंदुमुसलमानाचें ऐक्य घडविण्याचा महत्त्वाचा व मुख्य मार्ग म्हणजे मुस्लीम समाजांत आमूलाग्र मानसिक परिवर्तन घडून येणे, हा होय. आणि त्या परिवर्तनाचे मुख्य साधन म्हणजे राममोहन, आगरकर, विवेकानंद यांनी हिंदुसमाजांत प्रसृत केलेली बुद्धिवादी विचारसरणी हें होय. मुस्लीमांनी हिंदुस्थानला आपली मातृभूमि मानावी व तिच्या उन्नतीचा भार आपल्या शिरावर घ्यावा, या मताचे अनेक मुसलमान पंडित व लेखक भारतांत आहेत, हे आरंभी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट आहे. या विचारवंत मुस्लीमांना ही राष्ट्रनिष्ठा आपल्या