पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४११
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

भाषा, वन्देमातरम् हे राष्ट्रगीत या सर्वांचा मुसलमानांना द्वेष वाटतो. याचें कारण एकच आहे. आणि ते म्हणजे हे सर्व विधर्मीयांचे आहे. वास्तविक हे पुरुष, हे ग्रंथ, ही भाषा आज आपल्या अंगभूत गुणांनींच जगद् वंद्य ठरली आहेत. सर्व जग त्यांचा अभिमान बाळगते आणि हे आपल्या भारताचें वैभव म्हणून, तुर्कस्थान, इजिप्त येथील मुस्लीम राष्ट्रनेत्यांच्या धोरणानें पाहिले तर, येथील मुसलमानांना त्याचा जास्तच अभिमान वाटावा. पण जुन्या अंध धर्मनिष्ठा नाहींशा करून इस्लामला जे उदात्त रूप तुर्की नेत्यांनी दिले आहे तसे भारतांत देणारा नेता येथे झाला नाहीं. त्यानें मुस्लिमांना नव्या मन्वन्तरांतून नेलें नाहीं. ते होत नाही तोपर्यंत मुसलमानांना भरतभूमीच्या या वैभवाविषयीं प्रेम वाटणे शक्य नाहीं व हिंदुमुसलमानांचे ऐक्य यालाहि अर्थ नाहीं.
 आतांपर्यंत भारतांतील नेत्यांनी हिंदुमुसलमानांच्या ऐक्याचें पुष्कळच प्रयत्न केले. पण त्यांत या मूळ महातत्त्वाचा विचारहि कोणी केला नाहीं. काँग्रेसचे प्रयत्न झाले ते सर्व, हिंदूंना इतक्या जागा मिळाल्या तर मुसलमानांना किती, कोणच्या सवलती मुसलमानांना दिल्या म्हणजे ते किती प्रमाणांत या राष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामांत सहभागी होतील, असे देवघेवीच्या, व्यापारी व्यवहाराच्या स्वरूपाचे होते. मुसलमानांचा पाकिस्तानचा अट्टाहास सुरू झाल्यानंतरहि सर्वपक्षीय परिषदेत पं. कुंझरू यांनी अशी योजना सुचविली की, हरिजन सोडून राहिलेल्या हिंदुमुसलमान समाजांत दोन्ही जमातींना समान प्रतिनिधित्व द्यावें. आणि ही सूचना स्वीकार्य आहे, योग्य आहे असा आचार्य जावडेकरांनी आपला अभिप्राय दिला आहे. मुसलमान पुढाऱ्यांशी जेव्हा जेव्हां काँग्रेसच्या नेत्यांच्या वाटाघाटी होत तेव्हां तेव्हां त्यांचे स्वरूप याच प्रकारचे असे. हिंदूंनी मुसलमानांना काय द्यावे व त्याच्या बदल्यांत मुसलमानांनीं काय मान्य करावें. आरंभीच्या काळांत या प्रयत्नांना अर्थ होता. पण खिलाफत प्रकरणानंतर मुसलमान काँग्रेसपासून दूर झाल्यानंतर पुन्हां तसल्याच प्रकारच्या प्रयत्नांना कांहींहि अर्थ नव्हता. त्यांचे अंध धर्मवेड नाहीसे झाल्यावांचून ऐक्याची भाषा करण्यांत कांहीं अर्थ नाहीं, हें त्याच वेळीं स्पष्ट झाले होते. पण त्यानंतरहि अगदी स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत व्यापारी करारमदारांच्या स्वरूपाचेच प्रयत्न चालू होते. प्रारंभीचा