पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१०
भारतीय लोकसत्ता

सिरिया, इत्यादि मुसलमान राष्ट्रांनी हेंच धोरण अंगीकारलें, इजिप्तच्या राष्ट्रसभेचे चिटणीस हमीद् अल अलेली १९१० सालच्या आपल्या भाषणांत म्हणतात- 'ज्यांनीं पिरामिड उभारले, युरोपचें अस्तित्व नव्हते तेव्हां ज्यांनीं संस्कृति निर्माण करून तिचा प्रसार केला, त्यांचे कर्तृत्व, त्यांची प्रज्ञा आमच्या रक्तांत आहे.' पिरामिडचे निर्माते व इजिप्तचा प्राचीन ग्रंथ 'बुक ऑफ दि डेड' याचे कर्ते अर्थातच मुसलमान नव्हते. त्यामुळे ७ व्या शतकांत इजिप्त हा इस्लामधर्मी झाल्यापासून गेलीं १२०० वर्षे इजिप्तमध्ये या पूर्वजांचा कोणी अभिमान धरीत नव्हते. पण आतां इजिप्तमध्ये राष्ट्रभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अभिमानविषयांत धर्मदृष्टीपेक्षां राष्ट्रदृष्टि बळावली आणि हे पूर्वज वंद्य ठरले. त्यांचें रक्त आपल्या अंगांत आहे याचा इजिप्तमधल्या मुसलमानांना अभिमान वाटू लागला.
 हिंदुस्थानांतील मुसलमानांमध्यें ही राष्ट्रीय दृष्टि निर्माण झाली तरच हिंदु मुसलमानांचे ऐक्य शक्य आहे. तरच भारतीय समाज अभंग व संघटित होईल. पण हे घडविणे सर्वस्वी मुस्लीम नेत्यांच्या हाती आहे. जुन्या मुल्लामौलवींचीं वचनें, जुने धर्मग्रंथ, जुन्या रूढी हे विषय अत्यंत नाजुक असतात. त्यांत सुधारणा किंवा क्रान्ति घडवावयाची ती स्वधर्मीयांनीच घडविली पाहिजे. अन्यधर्मी मनुष्याच्या उपदेशाचा परिणाम समाजावर या बाबतींत अगदी विपरीत होतो. तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया या देशांतील धार्मिक व सामाजिक क्रान्ति ही त्या त्या देशांतील मुस्लीम नेत्यांनीच घडविली आहे. त्याप्रमाणे हिंदुस्थानांत झाले तरच मुसलमान समाज पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा, सामाजिक क्रान्ति या मन्वन्तरांतून जाईल व त्याच्या ठायी भारतीय राष्ट्राविषयी आपलेपणा निर्माण होईल. आज राम, कृष्ण, शिवाजी, टिळकं, गांधी या भारताच्या महापुरुषांविषयीं मुसलमानांना आदर नाहीं. एक सबंध राष्ट्र निर्माण करणाऱ्या शिवाजीपेक्षां त्यांना अफजुलखान श्रेष्ठ वाटतो. कारण शिवाजी विधर्मी व अफजुलखान मुस्लीम होता. डॉ. शोकत उल्ला अन्सारी यांनी मुसलमानांना काँग्रेस राज्याचा संताप व द्वेष वाटू लागण्याचीं जीं कारणे दिली आहेत त्यांत गांधीजयंति व टिळकपुण्यतिथि काँग्रेसने सरकारीरीत्या साजरी केली हे एक कारण म्हणून दिले आहे. व्यासवाल्मीकीसारखे महापुरुष, रामायण महाभारतासारखे ग्रंथ, संस्कृत