पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०९
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

केला तर त्यावरून आपणांस हेंच दिसून येईल. 'मी माझा देश आशियांतून उचलून युरोपांत नेऊन ठेवीन अशी केमालपाशाची प्रतिज्ञा होती. त्या प्रतिज्ञेचा दुसरा काय अर्थ आहे? 'वरील तीनहि मन्वंतरें मी तुर्कस्थानांत घडवून आणीन' हाच तिचा भावार्थ आहे. तुर्कस्थानचा गेल्या तीस वर्षांचा इतिहास पाहिला तर असे दिसून येतें कीं भारतांत हिंदुमुसलमानांचें ऐक्य घडून येण्यासाठी मुसलमान समाजांत जी निष्ठांची क्रांति घडून येणें अवश्य आहे असे भारतीयांना वाटतें ती क्रान्ति तेथें घडून आलेली आहे.
 ३ मार्च १९२४ रोजीं तुर्की लोकसभेपुढे केलेल्या भाषणांत केमाल पाशानें आपलें धोरण अगदीं स्पष्ट शब्दांत मांडलें आहे. 'यापुढे राजसत्तेचा व धर्माचा संबंध रहाणार नाहीं. विज्ञानाच्या पायावर शासनाची उभारणी होईल, जुनाट धर्मकल्पनांनी चालणारी न्यायमंदिरें व जुनीं धर्मशासनें नष्ट करून त्याजागी नवे शास्त्रशुद्ध निर्बंध आपण निर्माण केले पाहिजेत.' असे धोरण जाहीर करून केमालपाशानें कठोर निश्चयाने ते अमलांत आणलें. अंध धर्मनिष्ठेमुळे आरबी संस्कृति व आरबी भाषा यांचे जगांतल्या सर्व मुसलमानांवर वर्चस्व असतें. आतां राष्ट्रनिष्ठेला महत्त्व आल्यामुळे केमाल पाशानें तें वर्चस्व नष्ट करून टाकले. आणि तुर्कभूमीत निर्माण झालेले जे जे वैभव, त्याचा अभिमान धरण्यास त्यानें तुर्की लोकांना शिकविले. कुराण हा धर्मग्रंथ त्याला मान्य होता, पण तो तुर्की भाषेतून पढला पाहिजे, प्रार्थना तुर्कीतून झाल्या पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. स्वधर्मीयांखेरीज इतरांना काफर समजण्याची मुसलमानांची रीत आहे. ती त्यानें निषिद्ध मानली. महंमद पैगंबरांच्या पूर्वी होऊन गेलेले तुर्की थोर पुरुष मुसलमान असणे शक्य नव्हतें. इतके दिवस त्यांना कोणी वंद्य मानीत नसे. कारण ते विधर्मी होते. आतां दृष्टिकोन बदलला. अरबस्तानांतील मुसलमान थोर पुरुषांपेक्षां हे विधर्मी तुर्की थोर पुरुष आपणाला जास्त वंद्य होत, अशी भावना तुर्कस्थानांत सर्वत्र बळावली. पॅन इस्लामिझमच्या चळवळीचा तुर्की लोक आतां निषेध करूं लागले. कारण ती संघटना जुन्या अंध धर्मवेडाच्या पायावर उभारली होती. तुर्कांखेरीज इतर मुसलमानांशी आमचा इतर धर्मीयांप्रमाणेच संबंध राहील, इतरांपेक्षां आम्ही त्यांना जास्त जवळचे मानणार नाहीं, असे तुर्क राष्ट्राने जाहीर केलें. तुर्कस्थानामागोमाग इजिप्त,