पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०८
भारतीय लोकसत्ता

संभवत नाहीं. माझ्या भूमींत रहाणारे सर्व लोक- मग ते भिन्न धर्माचे, पंथाचे, वर्गाचे कसेहि असले तरी माझे बांधव आहेत आणि इतर भूमींतल्या कोणच्याहि मानवापेक्षां- स्वधर्मीयापेक्षांहि- ते मला जवळचे आहेत, ही भावना वरील तीन गुणांवांचून निर्माण होणे शक्य नाहीं. आणि सहिष्णुता, समता व प्रबुद्धता निर्माण होण्यासाठी रेनेसान्स, रेफर्मेशन व रेव्होल्यूशन- विद्येचे पुनरुज्जीवन, धर्मक्रान्ति व सामाजिक क्रान्ति- या मन्वंतरांतून समाज जाणे अवश्य आहे. पुनरुज्जीवनांतून मानवता व बुद्धिप्रामाण्य यांचे संस्कार होतात. धर्मसुधारणेंतून आचारविचारांचे कर्मकांड, अंधनिष्ठा, असहिष्णुता, धर्माधिकाऱ्यांचे वर्चस्व या घातक गोष्टी नष्ट होऊन मनाला औदार्य प्राप्त होते आणि सामाजिक क्रान्तींतून समता, बंधुता व स्वातंत्र्य यांचे प्रगल्भ संस्कार मनावर होतात. हे सर्व संस्कार मनावर होऊन मानवाच्या मनाची घडण समूळ बदलल्यावांचून देशांत राष्ट्रनिष्ठा निर्माण होत नाहीं. व तिच्यावर अवलंबून असलेली लोकशाही ही तर बाह्यरूपांतहि अवतरत नाहीं.
 भारताचें दुर्दैव असें कीं येथील मुसलमान समाज या मन्वंतरांतून गेला नाहीं. हिंदुमुसलमानांची समस्या अत्यंत बिकट होऊन बसली याचें मुख्य कारण हे आहे. भारताच्या लोकसत्तेचा विचार करतांना गेल्या अनेक प्रकरणांतून राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर, विवेकानंद यांनी आपल्या देशांत हीं मन्वन्तरें कशी निर्माण केलीं तें सविस्तर सांगितले आहे. आपल्या मुस्लीम बांधवांतहि आरंभी या चळवळी कांहीं अंशी सुरू झाल्या. पण पुढे त्यांचा प्रसार झाला नाहीं. त्यामुळे त्यांच्यावर जुन्या अंधनिष्ठांचे वर्चस्व बव्हंशीं जसेच्या तसे कायम आहे. उदारमतवाद त्या समाजांत प्रसृत झालाच नाहीं. आणि त्याचा प्रसार झाला नाही तोपर्यंत बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ होत. तुर्कस्थान, अरबस्तात, इजिप्त, इराक, इराण, अफगाणिस्तान, इ. मुस्लीम राष्ट्रांतील सध्यांच्या घडामोडी आपण पाहिल्या, तर या मन्वंतरांची लोकसत्तेला किती आवश्यकता आहे हे सहज कळून येईल. तुर्कस्थानाला केमालपाशासारखा अलौकिक प्रभावी व समर्थ नेता मिळाल्यामुळे तेथील राष्ट्रघटना यशस्वी झाली व तेथील लोकसत्ताहि यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. तुर्कीच्या लोकसत्तेचा आपण अभ्यास