पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९
मानवत्वाची प्रतिष्ठा

परस्परांतील संबंधावर अवलंबून आहे आणि म्हणून ते संबंध चांगले राखून सर्वांच्या सहकार्याने समाजाच्या उन्नतीची कार्ये केली पाहिजेत ही जाणीव ठेवून ज्या जनसमूहांतील घटक कार्यप्रवृत्त होतात, त्या समूहांत सामुदायिक जीवन निर्माण झाले आहे असे म्हणतां येईल. अशा समाजांतील प्रमुख व्यक्ति समाजाच्या उन्नतिअवनतीर्चे नेहमीं चिंतन करीत असतात, समाजांतील घडामोडीचे निरीक्षण करीत असतात व समाजाच्या भवितव्याविषयीं सदैव जागरूक राहून त्याला वेळोवेळी कार्यप्रवृत्त करीत असतात. समाज असा कार्यप्रवृत्त झाला म्हणजे तो सामाजिक जीवन जगत आहे असे आपण म्हणत. राजसत्तेमध्ये व्यक्तींच्या सहकार्याची अशी अपेक्षाच नसते. राजा व त्याचे अधिकारी आपल्या दृष्टिकोनांतून समाजाची व खरें म्हणजे आपल्या राज्याची काळजी वहातात व कांहीं कारणाने प्रजेच्या साह्याची आवश्यकता आहे असे दिसले तर आज्ञापत्र काढून सक्तीनें वा मोलाने, युद्धकाळीं ब्रिटिश सरकार जशी भारतीयांची सेवा घेत असे, त्याप्रमाणे, प्रजेची सेवा घेत असतात. अशी सेवा करण्यापलीकडे समाजांतील व्यक्ति सामाजिक किंवा सार्वजनिक असे कोणचेंच कृत्य करीत नाहींत आणि तसें करावयाचें नसल्यामुळे त्यांच्यांत सहकार्यांची भावनाहि फारशी निर्माण झालेली नसते. समाजाच्या परिस्थितीचें वा भवितव्याचे चिंतन हें तर त्यांच्या कधीं गांवींहि नसतें. त्यामुळे अशा समाजांत जीवन हें फुटीर व वैयक्तिक स्वरूपाचे असतें. सार्वजनिक जीवनाचा तेथे अभाव असतो आणि हें सार्वजनिक जीवन निर्माण झाल्यावांचून लोकशाहीच्या प्रवृत्ति निर्माण होणे शक्य नसते.

त्याचें लक्षण

 अशा सार्वजनिक जीवनाचे मुख्य प्रतीक, दृश्य स्वरूपांत गोचर होणारे पहिले प्रतीक म्हणजे त्या समाजांतील भिन्नभिन्न संस्था हें होय. अर्वाचीन समाजाचे जीवन हें संस्थांचे जीवन आहे. त्यांचा इतिहास म्हणजे त्यांतील प्रमुख संस्थांचा इतिहास होय व त्याची संस्कृति ही त्यांतील संस्थांची संस्कृति होय. आपले शरीर हें रक्ताच्या किंवा मांसाच्या कणाकणांनी घडलेले नाहीं. त्या रक्तमांसाच्या प्रथम पेशी होतात आणि त्या पेशी हेच शरीराचे आद्य घटक असतात. त्याचप्रमाणे समाजांतील भिन्नभिन्न संस्था याच