पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०७
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

तयार ठेवली असती तर ते अत्याचार अशक्य झाले असते आणि पाकिस्तानची कल्पना वाऱ्यावर विरून गेली असती. पण मुसलमानांना विरोध करणे म्हणजे जातीयता, आणि संघटना म्हणजे हिंसा, हे काँग्रेसचें विचारसूत्र ठरून गेले होते. त्यामुळे डायरेक्ट ॲक्शनला तोंड देणें हे काँग्रेसला कालत्रयी शक्य झाले नसतें. काँग्रेसचें हे तत्वज्ञान पाकिस्ताननिर्मितीला बऱ्याच अंशी कारण झालेलें आहे, हे आज तरी आपण विसरूं नये. इतिहासांतील घटितें आपणांस बदलतां येतील हे खरे नाहीं. पण भावी घटितें टाळतां येतील, हे निश्चित खरें आहे. आणि पाकिस्तान होण्याचें हे कारण आपण दृष्टिआड केले तर यापुढेहि अनेक पाकिस्तानें निर्माण होणे अशक्य नाहीं. कारण, हिंदुस्थानांतील ४/५ कोटी मुसलमानांना अजूनहि स्वयंनिर्णयाचा हक्क आहेच ! हैद्राबाद, अलीगड येथें त्या दृष्टीनें हालचालीहि चालू असाव्या असे दिसतें. आणि निधर्मीपणा व अहिंसा यांचे सध्यांचे अर्थ जोपर्यंत आपल्या मनांत रूढ आहेत तोपर्यंत आणखी दहापांच लाख हिंदूंची हिंसा होऊन आहे या हिंदुस्थानांतून दुसरे एक पाकिस्तान पुढील पंचवीस तीस वर्षांत निर्माण होणे अगदी असंभवनीय आहे असे मानण्याचे कारण नाहीं.
 हिंदु-मुसलमानांच्या संघर्षाचा व या दोन समाजांचे ऐक्य घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा गेल्या पन्नास पाऊणशे वर्षांचा इतिहास आपण पाहिला तर ऐक्य घडविण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी अनेकपरीने केले असले तरी खऱ्या दिशेने ऐक्यप्रयत्न कोणींच केलेले नाहींत हे थोडा विचार केला असतां सहज कळून येईल. अनेक देशांतील लोकसत्तांचा आणि त्यांतहि ब्रिटिश लोकसत्तेचा अभ्यास फार बारकाईने केला तर त्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येईल कीं, ब्रिटनमध्ये गेल्या तीनचार शतकांत मानवाच्या मनाची घडण समूळ बदलली असल्यामुळेच तेथे समाजसंघटना व लोकसत्ता ही शक्य झाली आहे. विद्येचे पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा व सामाजिक क्रांति हीं तीन मन्वंतरें ब्रिटनमध्ये व थोड्याफार अंशानें पश्चिम युरोपांतील सर्व देशांमध्ये घडून गेल्यावरच तेथें राष्ट्रनिष्ठा दृढमूल झाली व वाढीस लागली. राष्ट्रनिष्ठा ही लोकसत्तेची पूर्व अवस्था आहे. कारण धार्मिक सहिष्णुता, सामाजिक समता व राजकीय प्रबुद्धता यावांचून राष्ट्रनिष्ठा