पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०५
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

 या सर्व कालावधीत आणि विशेषतः १९२० नंतरच्या २०/२५ वर्षात मुस्लीम बांधवांना संतुष्ट करण्यासाठी, त्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी आणि त्यांच्या मनांत राष्ट्रीय भावना निर्माण करून स्वातंत्र्यांच्या लढ्यांत त्यांचें साह्य प्राप्त करून घेण्यासाठी, हिंदूंनी व विशेषतः काँग्रेसने पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. 'स्वराज्याचे हक्क आमच्या मुस्लीम बांधवांना दिले तरी चालतील' असे टिळकांनी जाहीररीत्या सांगितले होते. पुढे काँग्रेसची सूत्रे महात्माजींच्या हातीं गेल्यानंतर, त्यांनी कसलाहि प्रयत्न करण्याचें बाकी ठेवले नाहीं. त्यांनी लढा सुरू केला तोच मुळीं मुसलमानांच्या खिलाफत प्रकरणासाठी सातआठ कोटी लोकांना, त्यांच्या धार्मिक असंतोषाचा फायदा घेऊन, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध उठावणी करण्यासाठी सज्ज करण्याचा गांधीजींचा तो प्रयत्न राजकीय मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने फारच अभिनंदनीय असा होता. अशा संग्रामांतूनच दोन भिन्न समाजांत ऐक्य भावना निर्माण होत असतात. पण आपल्यासाठी आपले हिंदुबांधव लढले, तेव्हां त्यांच्याशीं आपण सहकार्य करावें, समरस व्हावें, ही भावना मुस्लीमांच्या मनांत मुळींच निर्माण झाली नाहीं. उलट, काँग्रेसला जे तेज आलें तें आम्ही मुसलमान तिच्यांत सामील झालो म्हणून आले, अशी उपकारकर्त्याचीच प्रौढी त्या वेळी अनेक मुसलमानांनी मिरवली; म्हणजे खिलाफतीच्या लढ्यांत हिंदु आपले सहकारी झाले, असे तर त्यांना वाटले नाहींच; तर उलट, काँग्रेसमध्ये जाऊन हिंदूंवरच आपण उपकार करून ठेवले आहेत, अशीच त्यांची भावना झाली. स्वातंत्र्याच्या लढ्यांत सहभागी होणें म्हणजे हिंदूंवर उपकार करणे होय, असे मानणाऱ्या समाजाला तो लढा आपला वाटत नव्हता, ते स्वातंत्र्य त्याचें स्वतःचें ध्येय नव्हते, हे अगदीं स्पष्ट आहे; पण हे पाहूनहि महात्माजींनी आपल्या मनाला निराशेच्या आहारी जाऊं दिले नाहीं; आणि अगदी शेवटपर्यंत मुस्लीमांचा अनुनय करण्याची पराकाष्ठा केली. १९३७ साली काँग्रेसला सत्ता प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक प्रांतांतले मंत्री मुस्लीमांना संतुष्ट करण्यांत अहमहमिका करूं लागले. आणि आपण त्यांच्यासाठी कोणचीं कोणचीं सत्कृत्ये केली त्यांच्या याद्या ते जाहीर करूं लागले. सत्तारूढ झाल्यानंतर काँग्रेस अहिंसामंत्राचा जप करीत असली तरी