पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०४
भारतीय लोकसत्ता

नेत्यांनी केला होता. १९०३ सालीं बुद्रुद्दीन तय्यबजी यांनीं अ. भा. मुस्लिम शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदावरून 'काँग्रेसच्या कार्याला विरोध करणाऱ्या कोणच्याहि संस्थेशीं दुरूनसुद्धां संबंध ठेवण्याची माझी इच्छा नाहीं.' असे उद्गार काढले. पुढील काळांत डॉ. अन्सारी, खान अबदुल गफारखान, हकीम अजमलखान इत्यादि मुस्लीम नेत्यांची काँग्रेसवरील निष्ठा याच प्रकारची होती. या सर्वात मौ. अबुल कलम आझाद यांचे प्रयत्न विशेष महत्त्वाचे आहेत. १९१२ साली त्यांनी 'अल हिलाल' हें राष्ट्रीय वृत्तीचा प्रसार करणारें साप्ताहिक सुरू केले. त्याचा खप २५००० पर्यंत गेला होता. मौ. आझाद यांनी तेव्हांपासून काँग्रेसची एकनिष्ठ सेवा केली आहे. मुसलमानांत राष्ट्रीय वृत्ति बाणविण्याचा प्रयत्न ते आज ४०/४५ वर्षे अखंड करीत आहेत. भारताच्या उत्कर्षाची जबाबदारी इतरांइतकीच, हिंदूंइतकीच मुसलमानांवरहि आहे, भारत हीच आमची मातृभूमि आहे, या भूमीवर बाहेरच्या मुस्लीमांनी आक्रमण केले तर त्या स्वधर्मीयांशींहि आम्ही लढूं, अशा तऱ्हेचे विचार इतरहि अनेक मुस्लीम पुढाऱ्यांनी या काळांत सांगितले होते. १९३१ सालीं लाहोर येथे नॅशनॅलिस्ट मुस्लीम कॉन्फरन्स भरली होती. मलिक बरकत अल्ली हे त्या वेळी स्वागताध्यक्ष होते. 'डॉ. इकबाल यांच्या पाकिस्तानच्या कल्पनेनें तुम्ही भ्रमून जाऊं नका. नव्या पिढीच्या मुस्लीमांना हिंदुस्थानच्या फाळणीची कल्पना कधीच मान्य होणार नाहीं.' असा उपदेश त्यांनी स्वबांधवांना त्या वेळी केला होता.
 पण यांतल्या कशाचाहि उपयोग झाला नाहीं. बॅ. जिना व त्यांचे पाकिस्तानवादी सहकारी यांचा प्रचारच प्रभावी ठरला. १९४६-४७ च्या निवडणुका या तत्त्वावर लढविल्या गेल्या आणि हिंदुस्थानच्या सर्व प्रांतांतील बहुसंख्य मुस्लीमांनी आपण पाकिस्तानवादी आहों, द्विराष्ट्रवादी आहों, भारताबद्दल आम्हांला आत्मीयता वाटत नाहीं, ही भूमि, हे लोक, ही संस्कृति यांचा आम्हांला संबंध नको, हा आपला निःसंदेह अभिप्राय प्रगट केला. आणि त्यामुळे काँग्रेसला हिंदुस्थानच्या फाळणीला मान्यता द्यावी लागली.