पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०३
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

आत्महत्या असून हिंदुस्थानचें स्वातंत्र्य व एकराष्ट्रीयत्व या मार्गात बॅ. जीना ही एक धोंड आहे, जीनांचे नेतृत्व प्रतिगामी आहे, त्यापासून आपल्या समाजाचे रक्षण केले पाहिजे, असेहि विचार या जाहीरनाम्यांत प्रकट केलेले आहेत. याशिवाय अझाद मुस्लीम कॉन्फरन्स, शियापरिषद्, अल्लाबक्ष यांच्या अध्यक्षतेखाली भरलेली जमियत उलउलेमांची परिषद्, साऊथ इंडिया अँटीसेपरेशन कॉन्फरन्स इ. अनेक संस्थांनीं पाकिस्तान मुसलमानांनाच घातक आहे, जीनांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास नाहीं, मुस्लीम लीग आमची प्रतिनिधि नाहीं, या अर्थाचे ठराव संमत केले होते. (इंडियन चार्टर- जहांगीर कोतवाल)
 याशिवाय भारताच्या अखंडत्वाला व हिंदुमुसलमानांच्या ऐक्याला पोषक असे अनेक विचार अनेक मुस्लीम पंडितांनीं व नेत्यांनी या काळांत आपल्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. हिंदु व मुसलमान यांचा धर्म भिन्न असला तरी मुळांत हे दोन्ही समाज एकवंशीय असल्यामुळे केवळ धर्मभेदामुळे त्यांनी फुटून निघण्याचे कारण नाहीं, हा विचार अफझल हक, अल्लाबक्ष, मिया महंमद शफी इत्यादि नेत्यांनी अनेक वेळां सांगितलेला आहे. हिंदुमुसलमानांच्या ऐक्याला, हिंदुस्थान ही आपली मातृभूमि आहे असे मानण्याला, इस्लाम धर्माचा मुळींच विरोध नाहीं, हा विचार तर अनेकांनी अनेक वेळा मुस्लीम समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पेन जिंकणारा मुसलमान सेनापति तारिक याचे वचन उद्धृत करून डॉ. शोकत अल्ली अन्सारी यांनीं, मुसलमानांना हिंदुस्थान ही परकी भूमि वाटण्याचें मुळींच कारण नाहीं, असे सांगितले आहे. एका पंडितानें तर, महंमद पैगंबर यांनी मुसलमानांनी मुस्लिमेतरांबरोबर एक राष्ट्र घडवण्याचा उपदेश केल्याचे सांगितले आहे. पैगंबरांच्या मतें राष्ट्र घडविण्यास एक धर्म असणे अवश्य नाहीं; तर भिन्न समाजांचे हितसंबंध एक असले की पुरेसे आहे.
 १९३७ च्या पूर्वीच्या काळांतहि हिंदुस्थान हीच आपली मातृभूमि आहे, भारतांतील इतर धर्मीयांसह आपणांस राष्ट्र म्हणून संघटित झाले पाहिजे, अशी मुसलमान समाजाला शिकवण देण्याचा प्रयत्न मुस्लीम