पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०२
भारतीय लोकसत्ता

 मुस्लीम समाजानें द्विराष्ट्रवादाचे, विभक्ततेचें हें जें तत्त्वज्ञान अंगीकारिलें व अनेक युक्त्याप्रयुक्त्यांनीं सफल करून दाखविले, त्याला त्यांच्या समाजांत कोणाचाच विरोध नव्हता असें नाहीं. अनेक मुसलमान लेखक, पत्रकार, पंडित, अनेक मुस्लीम संस्था यांनी याच काळांत पाकिस्तानच्या कल्पनेला कसून विरोध केला होता. पाकिस्तान हे मुस्लीम समाजालाच घातक आहे, हा विचार सांगण्यासाठी या मुस्लीम नेत्यांनी लेख लिहिले, पत्रके काढली, ग्रंथ लिहिले, सभा घेतल्या, ठराव केले, चळवळीहि केल्या; पण मुस्लीम जनतेला वळवून तिचा कौल आपल्याला अनुकूल करून घेण्यांत त्यांना अणुमात्र यश आले नाहीं.
 १९४३ व्या एप्रिलमध्ये मजलिस इ अहरार या संस्थेची सभा उत्तरप्रदेशांतील सहाराणपूर गांवीं भरली होती. तिच्या अध्यक्षपदावरून मौलाना गुलाम घौस यांनी पाकिस्तानला विरोध करून, 'हिंदुस्थानचें पूर्ण स्वराज्य हेच आमचें, आमच्या संस्थेचें व सर्वं मुसलमानांचे ध्येय आहे' असे सांगितले. 'स्वराज्य आलें तर हिंदूचें राज्य होईल अशी आपणांस मुळींच भीति वाटत नाहीं, तसे झाल्यास ते राज्य चालू न देण्याचें सामर्थ्य आमच्यांत आहे,' असेंहि त्यांनी बजावले. 'मुस्लीम लीग ही वास्तविक मुस्लीम जनतेची खरी प्रतिनिधि नसून काँग्रेस फक्त तिलाच पाचारण करते, इतर मुस्लीम संस्थांना करीत नाहीं, म्हणून आम्ही काँग्रेसशीं सहकार्य करीत नाहीं.' अशी तक्रार त्यांनी नमूद करून ठेविली आहे. त्याच एप्रिल महिन्यांत दिल्लीला मोमीनांची परिषद् भरली होती. त्या वेळीं अध्यक्ष जहिरुद्दिन यांनीं 'पाकिस्तानयोजना ही मुसलमानांनाच जास्त घातक असून आम्हांला ती मुळींच मान्य नाहीं. मुस्लीम लीग ही सर्व मुसलमानांची प्रतिनिधि नाहीं. आम्ही चारपांच कोटी मोमीन तिचें नेतृत्व मुळींच मानीत नाहीं. आपण सर्व मुस्लीमांचे प्रतिनिधि असल्याचा लीगचा दावा भ्रामक, विपर्यस्त व कपटीपणाचा आहे.' इत्यादि विचार सांगितले. मुस्लीम मजलीस ही संस्था १९४३ सालींच स्थापन झाली होती. पाकिस्तानला विरोध, हिंदुस्थानचे अखंडत्व, हिंदुस्थानचें पूर्ण स्वातंत्र्य, मुस्लीमांच्या हक्कांचे संरक्षण- हे आपले ध्येय असल्याचें या संस्थेच्या जाहीरनाम्यांत नमूद केलेले आहे. पाकिस्तान म्हणजे मुसलमानांची