पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०१
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

कांही झाले तरी आपल्याला येथें, या परक्या शत्रुदेशांत, रहाणे प्राप्त आहे, तेव्हां कशी तरी निभावणी केली पाहिजे, अशा केवळ अगतिक भावनेनें मुसलमान समाज हिंदुस्थानांत रहात होता. आणि इंग्रज राज्यकर्त्यांच्या आश्रयाने शक्य तितका आपला फायदा करून घ्यावा, अशी त्याची बुद्धि होती. हिंदुसमाजाबद्दल ममत्व, बंधुभाव, आपलेपणा असा त्याला कधीं वाटला नाहीं व वाटण्याची आवश्यकता कधी त्याला भासली नाहीं. पाकिस्तानची कल्पना उदयास येतांच त्या समाजाच्या या अगतिकेच्या, परिस्थितिवशतेच्या सर्व भावना नाहींशा होऊन त्याला एक नवें आशाकेंद्र दिसू लागले आणि मुस्लीम लीगने त्या नव्या आशाआकांक्षा सफल करण्याचा मार्ग दाखवून त्याविषयींची संभवनीयता स्पष्ट केली, तेव्हां अखिल भारतांतला मुस्लीम समाज तिच्यामागें संघटित होऊन उभा राहिला.
 १९३७ सालीं निवडणुकांत ज्या मुस्लीम लीगला कोठच्याच प्रांतांत थारा मिळाला नव्हता ती १९४६ सालच्या निवडणुकांत मुसलमानांची एकमेव प्रतिनिधि ठरली याचे कारण हे असें आहे. या सातआठ वर्षांच्या काळांत पाकिस्तानचा फार मोठ्या प्रमाणावर तिने प्रचार केला, काँग्रेसचें राज्य म्हणजे हिंदूचे राज्य, असे समीकरण तिने मांडले आणि ब्रिटिश राज्य येथून जातांच लोकशाहीच्या नियमानें बहुसंख्य जे हिंदु त्यांचे राज्य येथें प्रस्थापित होऊन त्यांच्या सत्तेखालीं इस्लामी धर्म व इस्लामी संस्कृति यांचा सर्वनाश होणार आहे, असें भविष्यकाळाचें भेसूर चित्र लीगच्या पुढाऱ्यांनी मुस्लीम जनतेपुढे उभें केलें. याला उपाय त्यांच्या मतें एकच होता. हिंदुस्थानची फाळणी करून मुसलमानांचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणें हा तो उपाय होय. हे द्विराष्ट्रवादाचें तत्त्वज्ञान मुस्लीम नेत्यांनी आपल्या समाजापुढे मांडलें. वर सांगितल्याप्रमाणे त्याच्या जोपासनेसाठी अवश्य ती भूमि आधींच तयार होती, त्यामुळे तें तत्त्वज्ञान त्या समाजाच्या मनांत तत्काळ रुजून त्याला धुमारे फुटले व ही भरतभूमि एकसंघ व अखंड करण्याचे प्रयत्न- हजारों वर्षांचे भारतीयांचे प्रयत्न- विफल होऊन या प्राचीन राष्ट्राचीं शकले झाली.

 भा. लो.... २६