पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४०१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४००
भारतीय लोकसत्ता

 १९३७ ते १९४६ या काळांत बहुसंख्य मुसलमान लीगच्या मागे गेले, त्याचे मुख्य कारण म्हणजे लीगने पुढे मांडलेली पाकिस्तानची, मुस्लीमांच्या स्वतंत्र राष्ट्राची कल्पना हे होय. सर सय्यद अहंमदांच्या काळापासून म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून मुसलमान हे ब्रिटिश सरकारचे दोस्त झालेले होतेच. हा मोठा समाज भारतीय समाजापासून तोडून आपल्याकडे घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पहिल्यापासूनच घवघवीत यश आलें होतें. ब्रिटिश सरकारच्या प्रेरणेने १८९२ सालापासूनच हिंदुमुसलमानांचें दंगे सुरू झाले होते. पुढे मुस्लीमांना विभक्त मतदार संघ देऊन सरकारनें कायमच तोडून काढले. त्या मागल्या काळापासूनच मुसलमानांच्या मनांत, कांही अपवाद वगळले तर- त्यांचा विचार पुढे होईलच– हिंदुसमाज, हिंदुसंस्कृति, हिंदुभूमी यांच्याबद्दल प्रेम नाहीं. तर पूर्ण तिटकारा आहे. आपण जेते आहो, श्रेष्ठ आहों, आणि हिंदु हे गुलाम आहेत, दास आहेत, याच भावना आपल्या मनांत ते पोषीत राहिले होते. मध्यंतरी १९२०-२६ या असहकारितेच्या काळांत खिलाफतीचा प्रश्न कॉंग्रेसनें उचलून धरला म्हणून मुस्लीमांनी वरकरणी भारतीयांच्या राष्ट्रीय आकांक्षांशी कांहींशी, अत्यल्प प्रमाणांत, समरसता दाखविली होती. पण याच काळांत वर सांगितल्याप्रमाणे सर्व हिंदुस्थानांत हिंदुमुसलमानांच्या दंग्यांना भयानक रूप प्राप्त झाले होते. त्या दंग्यांत येथील मंदिरें, महापुरुष आणि भारतीय संस्कृतीचीं इतर प्रतीकें, त्याचप्रमाणे वंदे मातरम् हे राष्ट्रगीत व काँग्रेसचा तिरंगी ध्वज हीं नव्या राष्ट्रीय आकांक्षांची प्रतीकें यांची मुस्लीमांनी पराकाष्ठेची हेलना करून, या भूमीविषयी, येथल्या संस्कृतीविषयी, येथल्या परंपरेविषयीं आपल्या काय भावना आहेत, ते वेळोवेळी प्रगट केले होते. म्हणजे १९४६ च्या आधी मुस्लीमांच्या भावना नंतरच्या भावनांपेक्षां कांहीं निराळ्या होत्या असें नाहीं. लीगच्या मागें किंवा इतर कोणच्याहि संस्थेच्या मागें ते अशा संघटित बलाने या वेळेपर्यंत उभे राहिले नव्हते इतकाच त्याचा अर्थ आहे. १९३७ सालानंतर निराळें झालें तें हे की आतांपर्यंतच्या त्यांच्या ज्या भावना, कोठलाच मार्ग दिसत नसल्यामुळे, कोंडून आंतल्या आंत सळसळत बसल्या होत्या त्यांना आतां अवसर प्राप्त करून देणारी पाकिस्तानची कल्पना जन्माला आली. ती नव्हती तोपर्यंत