पान:भारतीय लोकसत्ता.pdf/४००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९९
सामाजिक पुनर्घटना- हिंदुमुसलमान

 पण त्या सर्वांचा हा आशावाद १९४६ च्या निवडणुकांनी अगदी धुळीस मिळविला. या साली केंद्रीय विधिमंडळांत मुस्लिमांच्या मतांपैकी शे. ८७ मते लीगला मिळाली. प्रांतीय विवडणुकांत ६० लक्षांपैकी ४५ लक्ष म्हणजे शे. ७५ मते लीगला मिळालीं. १९३७ साली मुस्लिमांच्या ४९२ राखीव जागांपैकी सर्व प्रांत मिळून लीगला १०९ मिळाल्या होत्या. १९४६ साली ४९२ पैकीं लीगला ४२८ जागा मिळाल्या. पंजाबमध्ये लीगला ३७ साली एकच जागा होती. तेथें आतां ७५ मिळाल्या. सिंध मध्ये एकहि जागा ३७ साली नव्हती. ४६ सालीं २७ जागा लीगनें जिंकल्या. बंगालमध्ये ३९ ऐवजी आतां ११४ जागा लीगकडे गेल्या. दक्षिण हिंदुस्थानांतहि असाच प्रकार घडला. मद्रासमध्ये ३७ साली लीगला १० प्रतिनिधि पाठवितां आले. ४६ सालीं तिनें २८ पाठविले. मुंबईत १८ ऐवजी ३०, मध्यप्रांतांत ५ ऐवजी १३ अशी वाढ झाली. उत्तर हिंदुस्थानांतील अजून भारतांत असलेल्या प्रांतांतहि हेच दृश्य दिसले. ३७ सालीं बिहारमध्ये लीग एकहि जागा जिंकू शकली नव्हती. आतां तिने ३४ जिंकल्या उत्तरप्रदेशांत २६ च्या ऐवजी ५४ जागा तिने मिळविल्या. म्हणजे १९३७ ते १९४६ ह्या काळांत आज पाकिस्तानांत गेलेल्या प्रांतांतच लीगचें वर्चस्व वाढले असें नसून सध्यां हिंदुस्थानांत राहिलेल्या प्रत्येक प्रांतांतहि मुस्लीमांच्या समाजांतील बहुसंख्य लोक लीगवादी बनले असें स्पष्ट दिसतें. १९४६ च्या जुलैमध्ये घटनापरिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यांतहि मुस्लीम समाजानें, आम्ही सर्व लीगवादी म्हणजे पाकिस्तानवादी व द्विराष्ट्रवादी आहों, या भूमीबद्दल आम्हांला भक्ति नाहीं, ही आमची मायभूमी आहे असे आम्हांला वाटत नाहीं, हाच अभिप्राय प्रगट केला. घटना परिषदेतील ८० जागांपैकी ७३ जागा लीगने मिळविल्या. दोन तपें मुस्लीमांच्या हृदयपालटासाठी अहोरात्र खटपट करणाऱ्या काँग्रेसला मुस्लीमांच्या फक्त चार जागा मिळाल्या, अँग्लो इंडियन, खिश्चन, शेड्ल्ड् कास्टस् यांच्या जागांपैकी बहुतेक सर्वच्या सर्व काँग्रेसला जिंकतां आल्या. पण मुस्लीमबांधवांच्या बाबतीत तिचा प्रभाव चालू शकला नाहीं. आपल्या सर्व प्रतिज्ञा, घोषणा व वचनें मागें घेऊन काँग्रेसला या देशाच्या फाळणीला मान्यता द्यावी लागली त्याचें हें कारण आहे.