पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९८
भारतीय लोकसत्ता

असा त्या निवडणुकांतून निर्णय निघत होता. एकंदर मुस्लीमांची मतें ७३ लक्ष १९ हजार होती. त्यापैकी ३ लक्ष २१ हजार मतेंच फक्त म्हणने शे. ४·४ मतें लीगला मिळालीं, बिहार, वायव्यसरहद्द, ओरिसा व सिंघ या प्रांतांत लीगला एकहि जागा मिळाली नाहीं. पंजाबमध्ये १७५ जागांपैकीं लीगला फक्त एक मिळाली. बंगालमध्ये लीगला ३९ जागा मिळाल्या तर लीगेतर मुस्लीमांना १२२ जागा मिळाल्या. सिंध, पंजाब, सरहद्द व बंगाल या मुस्लीम बहुसंख्य प्रांतांत लीगची अशी वाताहत झाली, मग इतरत्र काय झाले असेल याची कल्पना सहज येईल. मुस्लीमांच्या जागा लीगला मिळाल्या नाहींत म्हणजे त्या काँग्रेसला मिळाल्या असे नाहीं. त्या बहुतेक लीगेतर मुस्लीम पक्षांना- युनियनिस्ट, राष्ट्रीय मुस्लीम, मोमीन, अहरार इ. पक्षांना मिळाल्या. तरी लीगचे वर्चस्व मुस्लीमांवर नाही, असे त्यामुळे निश्चित झाले.
 हिंदुमुसलमानांच्या ऐक्याच्या प्रतिपादकांना व विशेषतः काँग्रेसचें मुस्लिमांविषयींचें जे उदार धोरण त्याच्या पुरस्कर्त्यांना हा देखावा फारच आशादायक वाटला. मुस्लिमांची वृत्ति जातीय नसून राष्ट्रीय आहे, द्विराष्ट्रवाद त्यांना मुळींच मान्य नाहीं, महात्माजींचें व काँग्रेसचें त्यांच्याविषयींचें धोरणच समर्थनीय ठरले, असे निष्कर्ष त्यांनी काढले व संघटित भारतीय समाजाचीं सुखस्वप्ने ते पाहूं लागले. वास्तविक अशीं स्वप्नें पहाण्याचा त्यांना कसलाहि अधिकार नव्हता. १९२१ ते १९३७ या काळांत पाकिस्तानचा प्रचार पुढील काळासारखा तीव्र वेगाने होत नसला तरी त्या काळांत हिंदुस्थानांतील बहुतेक प्रांतांत हिंदुमुसलमानांचे अत्यंत भयानक असे दंगे जवळ जवळ दरसाल होत होते. आणि हिंदूंवर मुलसमानांचें अनेक प्रकारांनी आक्रमण चालू होतें. कत्तली, जाळपोळ लूट यांना सीमा राहिली नव्हती. १९२७ सालापासून मुसलमान काँग्रेसपासून दूर चालले होते व स्वातंत्र्याच्या लढ्यांत बहुसंख्य मुसलमान सहकार्य करीत नव्हते. असा पूर्व इतिहास होता तरी १९३७ च्या निवडणुकांत लीगला मुळींच थारा न मिळाल्यामुळे मुसलमान समाजांत भारताबद्दल राष्ट्रनिष्ठा जागृत झाली, असा निर्वाळा बहुतेक लेखक देऊ लागले.