पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
भारतीय लोकसत्ता

जें वर सांगितले तें जर सत्य असेल तर ते घडविण्याचे श्रेय गेल्या शंभर- दीडशे वर्षांत अर्वाचीन भारतांचा इतिहास ज्या महाभागांनी घडविला त्यांनाच आहे हे निर्विवाद आहे. म्हणूनच राजा राममोहन रॉय यांच्यापासून पंडित जवाहरलाल यांच्या पर्यंतच्या सर्व पुरुषांनी या लोकसत्तेच्या जोपासनेसाठीं कोणते परिश्रम केले, कोणतीं तत्त्वे सांगितलीं, कोणतीं व्रते आचरली व कोणत्या निष्ठा येथे दृढमूल केल्या हे समजून घेणं फार अगत्याचे आहे. हें आपणांस समजले तर भावी काळांत आपल्याला आपल्या लोकसत्तेचा विकास करून भरतराष्ट्र हें एक प्रबल व दुर्जय असे लोकसत्ताक राष्ट्र बनविण्यांत यश येईल.
 मागें सांगितल्याप्रमाणें सध्यांच्या आपल्या लोकशाहीच्या प्रेरणा पाश्चात्यांकडून आलेल्या आहेत. आपण लोकशाहीचे पाठ युरोपीयांकडून व विशेषतः ब्रिटिशांकडून घेतले आहेत. गेल्या शंभर वर्षात आपल्याकडचे हजारों लोक युरोप-अमेरिकेचा प्रवास करून आले, हजारों लोकांनीं त्यांच्या राजकीय व इतर संस्थांचा ग्रंथांतून अभ्यास केला, लक्षावधि लोकांवर शाळा-कॉलेजांतील शिक्षणामुळे त्या विचारांचे संस्कार झाले आणि ब्रिटिशांनी गेल्या पन्नास वर्षात येथे ज्या अर्ध्यामुर्ध्या लोकायत्त संस्था स्थापन केल्या, त्यामुळे अखिल समाजाच्या डोक्यांवरून केव्हांना केव्हां तरी या विचारांच्या लाटा जाऊन तो बहुजन समाजहि या नव्या विचारांच्या रसायनांत थोडाफार भिजून निघाला आहे. अशा रीतीने सध्यांच्या आपल्या लोकशाहीच्या प्रेरणांच्या बाबतींत आपण सर्वस्वी पाश्चात्यांचे ऋणी आहो. म्हणून आपल्या लोकसत्तेचा अभ्यास करतांना आपण पश्चिमेंत विकसित झालेल्या लोकसत्तेची तत्त्वें कोणची व त्यांना भारतांत आणतांना आपल्या नेत्यांनी त्यांच्यावर कोणचे संस्कार केले, त्यांना कोणचे रूप दिले व तो आत्मसात् करून या देशांत तीं कशीं प्रसृत केलीं तें पाहिलें पाहिजे. यासाठी गेल्या शतकांत पश्चिमेकडून या भूमीत आलेल्या लोकशाहीच्या भिन्नभिन्न प्रेरणांच्या विवेचनास आतां आरंभ करतो.

सामुदायिक जीवन

 लोकसत्ता हें सामुदायिक जीवन आहे. सार्वजनिक जीवन आहे. सर्व समाजाचे हिताहित एक आहे, ते हिताहित त्या समाजांतील व्यक्तींच्या