पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९५
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

शेकडों वेळां प्रगतीची, उच्च जीवन प्राप्त करून घेण्याची संधि मिळालेली असतांना, आज आपल्या हीन दशेचें कारण म्हणजे स्पृश्य हिंदूंचा जुलूम एवढेंच अस्पृश्यांनी म्हणत बसावे हे प्रचाराच्या दृष्टीने युक्त असले तरी आत्मनिरीक्षणाच्या दृष्टीने सर्वस्वी हानिकारक आहे. सवर्णीयांवर त्यांनी टीकेचा भडिमार अवश्य करावा. ते निःसंशय समर्थनीय आहे. कारण त्यांनीं घोर अन्याय केला आहे ही वस्तुस्थितीच आहे. पण त्यापेक्षां शतपट भडिमार त्यांनी स्वतःवर केला पाहिजे. ही भूमिका अस्पृश्यांनी व अदिवासी समाजांनी स्वीकारली तर पूर्व काळीं केव्हां तरी एकमेकांचे वैरी असलेले स्पृश्य, अस्पृश्य व आदिवासी हे समाजमनाच्या दिलदारीचा व उदारवृत्तीचा परिपोष करूं शकतील. आणि तसे झाले तरच भावीं काळांत त्यांच्या संघटनेंतून अभंग, एकसंघ असा भारती समाज निर्माण होऊ शकेल. जुन्या काळी वैरी म्हणून राहिलेले समाज जुन्या वैराचे दंश खेळी मेळीनें विसरतील तरच त्यांचे ऐक्य होऊं शकते. पण आपण पराभूत झालो त्याला आपले प्रमादहि अंशतः कारणीभूत आहेत, असें दोन्ही पक्षांना वाटल्यावांचून खेळीमेळीची भावना निर्माण होणे शक्य नाहीं. तेव्हां स्वतःच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आणि भारती समाजाच्या पुनर्घटनेच्या दृष्टीनेहि अस्पृश्यांनीं आत्मनिरीक्षणाची भूमिका स्वीकारणे अवश्य आहे असे वाटते.

तारकमंत्र

 आणि ही भूमिका स्वीकारतांच उन्नतीचा एक राजमार्ग त्यांच्या दृष्टीस पडेल. केवळ अस्पृश्यांच्या जातीय उन्नतीच्या दृष्टीने पाहिले तरी अखिल भारताच्या उत्कर्षाची जबाबदारी आपल्यावर आहे हीच भावना त्यांना तारक ठरेल. त्या भावनेचा परिपोष झाला तरच त्यांच्यांतून मोठमोठे शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार, मुत्सद्दी, पंडित, तत्त्ववेत्ते, इतिहासकार, शिक्षणशास्त्रज्ञ असे वैभवशाली पुरुष निर्माण होतील. जातीच्या उन्नतीच्या चळवळी त्यांनी थांबवाव्या असें मला म्हणावयाचें नाहीं. पण अखिल भारताचे चिंतन हा माझ्या मतें जातीय उन्नतीचाच मार्ग आहे. किंवा हे मुळींच पटत नसले आणि केवळ जातीय उन्नति हीच दृष्टि ठेवावयाची असली तरी, त्या हेतूने सुद्धां श्रेष्ठ राष्ट्रीय