पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९४
भारतीय लोकसत्ता

अभिसरणास हिंदुसमाजाची कधींच हरकत नव्हती. अस्पृश्यांवर सवर्ण हिंदूंनीं व विशेषतः ब्राह्मणांनीं जुलूम केला असा इतिहास आहे, पण आतां असे ध्यानांत येत आहे कीं कित्येक अस्पृश्य जमातींनी ब्राह्मणांना कधींच गुरु मानले नाहीं. आणि ब्राह्मणहि अस्पृश्यांचे धर्मविधि करण्याचें काम बहुधा स्वीकारीत नसत. ब्राह्मण अस्पृश्यांना हीन लेखीतच. पण कित्येक ठिकाण अस्पृश्यहि ब्राह्मणांना हीन लेखीत व आपल्या वस्तीत पाऊल टाकूं देत नसत. डॉ. आंबेडकर ही गोष्ट अभिमानाने सांगतात, (हू वेअर दि अन्टचेबल्स पृ. ७४) आणि अस्पृश्य मूळचे बौद्ध होते असेहि म्हणतात. म्हणजे ज्या रक्ताचे आर्य त्याच रक्ताचे अस्पृश्य. पूर्वी ते एकदां राजसत्ताघीश होते. ब्राह्मणांचा तिटकारा करण्याइतकें मानसिक धैर्य व सामाजिक सामर्थ्य त्यांच्या ठायीं होते. असे असतांना युगानुयुगे अत्यंत भयंकर जुलूम, घोर अन्याय, अगदीं नरकवासाचें जिणे हे सर्व सहन करीत आपण कसे राहिलों, हा प्रश्न अस्पृश्यांनी स्वतःस विचारला पाहिजे. हिंदुस्थान हा १८ लक्ष चौरस मैलांचा देश, आणि सहा हजार वर्षांचा त्याचा इतिहास. एवढ्यामध्ये अर्वाचीन काळचा विचार केला तरी मुसलमान, पोर्तुगीज, इंग्रज यांनी ब्राह्मणांना व एकंदर स्पृश्य हिंदूंना अनेक वेळां नामोहरम केले होते. त्या संधीचा फायदा घेऊन आपण उठावणी करून सवर्णीयांचे हें किळसवाणे वर्चस्व कां नष्ट केले नाहीं, याचा विचार तरुण सुशिक्षित अस्पृश्यांनी केला पाहिजे. शंभर वर्षांपूर्वी पेशव्यांशीं लढून आम्हीं इंग्रजांना राज्य मिळवून दिलें, असें महारांचे नेते म्हणतात. म्हणजे इंग्रजांचे त्यांना अपरिमित साह्य त्याच वेळी झाले होते. त्यांचा आत्मविश्वास तेव्हांच जागृत झाला होता. असें असून गेल्या शंभर वर्षात महारांनी कोणची प्रगति करून घेतली? आज शंभर वर्षांनीं, इंग्रजांनी आम्हांला फसविले, आमचा फक्त उपयोग करून घेतला व मग आम्हांला तोंडघशी पाडले, अशी तरी भूमिका अस्पृश्य घेतात किंवा इंग्रजच आमचे तारक, ते गेले तर पुन्हां हे ब्राह्मण, क्षत्रिय व बनिये आम्हांला नरकांत घालतील, अशी भूमिका पत्करतात. दोन हजार वर्षांत एवढ्या वितीर्ण प्रदेशांत, हजारों उलथापालथी होत असतांना, कोणीहि कोणच्याहि थरांतून कोठेहि जात असतांना, परकीय आक्रमणामुळे, त्यांचा आश्रय करणाऱ्या अस्पृश्यांना