पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९६
भारतीय लोकसत्ता

वैभवाची जोपासना करण्याचा मार्गच त्यांनी अनुसरणें अवश्य आहे. डॉ. आंबेडकरांनीं सुद्धां, आतां आपण राष्ट्रीय दृष्टीनेंच कार्याला लागले पाहिजे, असे उद्गार दिल्ली, हैदराबाद, येथील भाषणांत अनेक वेळां काढले आहेत. पण अस्पृश्य व आदिवासी यांनी कठोर आत्मनिरीक्षणाची भूमिका घेतल्यावांचून, आपल्या अधःपाताला अंशतः तरी आपण जबाबदार आहो ही जाणीव स्वसमाजांत निर्माण केल्यावांचून, ही अखिल राष्ट्रीय निष्ठा व केवळ तिच्यांतूनच निर्माण होणारे वैभव त्यांना प्राप्त होणार नाहीं.
 आजचा जगांतला कोणचाहि देश घेतला तरी पुरातन काळापासून तेथे एकच समाज नांदत होता असे म्हणता येणार नाहीं. मागल्या काळी शेकडों जमाती इतस्ततः भ्रमत होत्या. प्रत्येक देशांत पंधरावीस जमातींचे मिश्रण तर सहज झालेले आहे. या जमाती जेव्हां प्रथम एकत्र आल्या तेव्हांचे त्यांचे संबंध स्नेहाचे, मैत्रीचे, आपुलकीचे असे मुळींच नव्हते; तर शत्रुत्वाचे, जित-जेत्यांच्या वैराचे, भिन्न वंशीयांच्या द्वेषाचे, असेच होते. पण हळूहळू त्यांनी ते शत्रुत्व, ते वैर व द्वेष दृष्टीआड करून ऐक्यपोषक अशा घटकांकडे जास्त लक्ष दिले; व तसे घटक नसतील तर ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेच धोरण भरतभूमीतील आजच्या भिन्न घटकांनीं अवलंबिलें पाहिजे. निदान स्पृश्य हिंदुसमाजानें तरी या तत्त्वाचा कधींहि विसर पडूं देतां कामा नये. अस्पृश्य व आदिवासी यांच्या मनांतील संतापाचे व अन्यायाच्या निष्कृतीचे भाव एकाएकी शमतील असे नाहीं. तें कालगतीचें काम आहे. पण स्पृश्य समाजानें त्यांकडे दुर्लक्ष करून गेल्या शंभर वर्षातील धोरणच एकनिष्ठेने पुढे चालवावयाचे हे व्रत स्वीकारले व भारती समाज संघटित करावयाचाच अशा प्रतिज्ञेने पावले टाकलीं, तर लोकशाहीला अवश्य ती अभंगता आपल्या समाजांत निर्माण होणे अशक्य आहे असे नाहीं.