पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९२
भारतीय लोकसत्ता

झाले आहेत. श्री. विल्स यांच्या मतें पैक्रा कानवार ही जमात म्हणजे हिंदूकरणामुळे होणाऱ्या प्रगतीचा आदर्शच होय. कानवाराप्रमाणेच कुरमी महतोस या जमातीने आपल्या क्षत्रियत्वास मान्यता मिळविलेली आहे. यांची लोकसंख्या सुमारे सात लक्ष आहे.
 हिंदूंच्या संसर्गानें आदिवासी जीवनावर कसलेच वाईट परिणाम झाले नाहींत असें नाहीं. ब्रिटिश राज्यपद्धति रूढ झाल्यावर हिंदूंच्या सरहद्दीवर रहाणाच्या वन्य जमातीमध्ये दारूचे मक्तेदार व सावकार यांनी अगदीं अनर्थ करून सोडला होता. त्याचप्रमाणे जुना धर्म सुटला व नवीन आत्मसात् करता आला नाहीं यामुळे कित्येक जमातींचा अधःपात झाला आहे. पण हे समाजव्यवस्थेच्या मूलतत्त्वांचे दोष नव्हत. आपण त्या मूलतत्त्वांच्या दृष्टीने विचार करीत आहोत. आणि त्या दृष्टीने पहातां, ज्या जमाती मागें राहिल्या त्या स्वतःच्या अंगचा आळस, नाकर्तेपणा, व्यसनाधीनता या दुर्गुणांनीं राहिल्या, असेच या विद्वान् संशोधकांनी आपले मत दिले आहे.

स्वतःची जबाबदारी

 हिंदु समाजरचनेचा व भारती समाजाच्या नव्या घडणीचा विचार करतांना हें सामाजिक निगमन अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते. अस्पृश्य समाजाची सध्यांची स्थिति, त्याचा पूर्वेतिहास व त्याची भावी काळांतील प्रगति याविषयीं यावरून कांहीं महत्त्वाचे विचार सुचतात. आज अस्पृश्यांतील कांहीं पंडित, पूर्वकाळी आम्ही येथले राजे होतों, शास्ते होतों, असे सांगतात. 'हू वेअर दि अनटचेबल्स' या आपल्या पुस्तकांत डॉ. आंबेडकरांनीं, सध्यांचे अस्पृश्य म्हणजे भिन्नभिन्न जमातींतून सांडलेले, तुटून निघालेले, फुटलेले असे गांवाच्या सरहद्दीवर गुजारा करून रहाणारे पण सध्यांच्या सवर्णीयांच्याच रक्तामांसाचे लोक होत, असें म्हटले आहे. हीं मतें जर खरी असतील तर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. सध्यांची हीन स्थिति या लोकांना कां प्राप्त झाली, हा तो प्रश्न होय. या प्रश्नाचा अर्थ असा या लोकांवर सवर्णीयांनी जुलूम केला, अत्यंत अन्यायानें व दुष्टपणानें त्यांना वागविलें, त्यांच्या सर्व जीविताचा कोंडमारा करून त्यांना माणुसकीतूनहि खाली ओढले, याविषयी कसलीहि शंका नाहीं. आणि हा