पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९१
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

भिल्ल, गोंड, संताळ, महतोस, भूईया या वन्य जमाती सुद्धां येथें बाहेरून आलेल्या असण्याचा संभव आहे. कोणाच्या मतें येथें त्यांच्यापूर्वी निग्रोवंशाचे लोक असावे. दुसरें असें की भिल्ल, गोंड, इ० जमाती आज जेथे राहतात तेथेंच त्या पहिल्यापासून राहिलेल्या आहेत असें नाहीं. एक आदिवासी जमात दुसरीवर आक्रमण करून तिला देशोधडीला लावते व आपण तेथे वस्ती करते, हा प्रकार मागें सारखा चालू होता. कोल या जमातीनें भूईया जमातीला उठविले. गोंड व कामर यांनी महतोस, कोरव, भिंजवर यांना उठवून विलासपूर हद्दीत हाकलून लावले. तात्पर्यार्थ असा की, आम्ही या अमक्या भूमीचे पहिले वारसदार, असा इक्क इतिहासाच्या आधारें सांगून नसते कलह निर्माण करण्याची जी आज प्रवृत्ति निर्माण होत आहे तिला या पंडितांचा मुळींच आधार नाहीं.
 दुसरी गोष्ट- हिंदु समाजाने आजपर्यंत या वन्यजमातींच्या उद्धारार्थ कसलेच प्रयत्न केले नाहीत, त्यांची केवळ उपेक्षा केली, असा समज आहे, तो अगदी भ्रामक आहे असे या संशोधकांचे मत आहे. वर ज्या अनेक जमाती सांगितल्या त्यांपैकी प्रत्येक जमातीचे पुष्कळसे लोक हिंदुधर्माच्या कक्षेत समाविष्ट करून घेण्यांत आलेले आहेत. आणि अशा हिंदूकरणामुळे त्या आदिवासी जमातींची सर्वतोपरी प्रगति झालेली आहे असा या पंडितांनीं निर्वाळा दिला आहे. (दि ॲबोरिजिनस्- सो कॉल्ड- अँड देअर फ्यूचर - डॉ. जी. एस्. घुर्ये- या पुस्तकाच्या पहिल्या तीन प्रकरणांतून ही माहिती व विचार संकलित केले आहेत.) मात्र हें हिंदूकरण वर सांगितलेल्या पद्धतीने झालेले आहे. या जमाती हिंदुत्वाच्या कक्षेत आल्या; पण त्यांच्यावर सक्तीनें कसलेच आचारविचार लादले गेले नाहींत. हिंदूचीं दैवतें, आचार, विचार, तत्त्वज्ञान त्यांनी स्वीकारले. त्याचप्रमाणे ज्यांच्याशेजारी या जमाती राहू लागल्या त्या हिंदूंच्या धर्ममतांवर व आचारांवर त्यांच्या मतांचा व आचारांचाहि परिणाम झालेला आहे. या लोकांचा हिंदुत्वांत समावेश झाला तो सर्वस्वी खालच्या थरांत झाला असेंहि नाहीं. भिल्ल, गोंड, कोरकू यांच्यांतील कांहीं शाखांनी आपली खूपच प्रगति करून घेतली व आपण क्षत्रिय आहोत, रजपूत आहोत असा हक्क सांगून त्याला मान्यताहि मिळविली आहे. त्यांतील कांहीं मोठमोठे जमीनदार व कांहीं मोठ्या दर्जाचे शेतकरी