पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३९०
भारतीय लोकसत्ता

ऱ्यांची परिषद् भरली होती. अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, महामंत्री नेहरू, उपाध्यक्ष राधाकृष्णन् हेहि या परिषदेला जातीने उपस्थित होते. यावरून या प्रश्नाचे अस्पृश्यांच्या प्रश्नाइतकेच महत्त्व आहे याची पुरेपूर जाणीव भारतीयांना झाली आहे असे वाटते.
 या लोकांना जमिनी द्याव्या, सावकारादि आक्रमकांपासून त्यांना संरक्षण द्यावें, त्यांच्यासाठी शाळा, आरोग्यभुवने, वसतिगृहे, शिष्यवृत्या, अधिकाराच्या जागा यांची सोय करावी, आणि हजारों कार्यकर्ते तयार करून भारताच्या नागरिकत्वाची पदवी या वन्य जमातींना त्वरेनें प्राप्त करून द्यावी, असा सरकारचा संकल्प आहे. त्याप्रमाणे आतां कार्याला सुरवात होऊन हळूहळू या जमातींची प्रगति होऊं लागेल. ही प्रगती होऊं लागतांच अस्पृश्याप्रमाणेच त्यांच्या जमातींविषयहि अनेक तात्त्विक प्रश्न निर्माण होतील. त्यांचा विचार करण्यास व या जमातींविषयीं धोरण ठरविण्यास सोपे जावें म्हणून कांहीं तात्त्विक व ऐतिहासिक चर्चा येथे करावयाची आहे.
 गेली साठसत्तर वर्षे या देशांत दशवार्षिक शिरगणति होत असते. त्यावेळी या शिरगणतीवरून मिळालेल्या माहितीच्या आधारें येथील सामाजिक प्रश्नांचे तात्त्विक मंथन करण्यासाठी मोठमोठे तज्ज्ञ अधिकारी नेमलेले असतात. बेनस्, शूबर्ट. डॉ. इटन, सर हर्बर्ट रिसले, ड्रॅकप, लेसी, रॉय, बसू, मुजुमदार ही या क्षेत्रांत अभ्यास करणारी प्रमुख विद्वान् मंडळी होत. त्यांनीं त्या त्या वेळीं जी विवेचनें करून ठेवली त्यावरून मिळणारी माहिती व त्यांनी सांगितलेले विचार आपल्या समाजाच्या घडणीच्या दृष्टी प्रत्येक सुशिक्षित भारतीय नागरिकास माहीत असणे अवश्य आहे असे वाटल्यावरून ते येथे दिले आहेत.

मूळचे कोण ?

 पहिली महत्त्वाची गोष्ट अशी कीं, या भूमतले अगदीं मूळचे रहिवासी कोण हे निश्चितपणे सांगणे शक्य नाहीं. आर्यांच्या आधीं, द्रविडांच्याहि आधी आलेल्या म्हणून आदिवासी किंवा आदिद्रवीड असें म्हणून सध्यांच्या वन्य जमाती या मूळच्या रहिवासी असे आपण समजतों; पण या पंडितांच्या मतें