पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८९
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

कोण, हें निश्चित झालेलें नाहीं. आर्य म्हणजे नेमके कोण, असुर, दास, दस्यु, शूद्र, हीं अभिघाने मागल्या काळी नेमकी कोणाला उद्देशून लाविलीं होतीं हे नक्की सांगता येत नाहीं. चातुर्वर्ण्य ही आज अन्याय्य वाटणारी संस्था आर्यानीं निर्माण केली की द्रविडांनी, हेहि निश्चित ठरवितां येत नाहीं. आश्रमधर्माची स्थापना तर प्रल्हादपुत्र कपिलासुर या असुराने केली, असे कोणाकोणाचे मत आहे. वेदकाळीं व त्यानंतरच्या काळांत येथे अनेक लढाया झाल्या. त्यांत उभयपक्ष नेमके कोणचे होते, म्हणजे त्या लढाया आर्यअनार्यांत होत्या की आर्याआर्यांत होत्या, का आर्य व दस्यु, आर्य व असुर यांच्यांत होत्या, याविषयीं पंडितांत एकमत नाहीं. अस्पृश्यता नेमकी केव्हां निर्माण झाली, कां निर्माण झाली, आणि अस्पृश्य हें मूळचे कोण याविषयीं तर एखादी उपपत्ति सांपडली आहे असं वाटण्याइतकेहि समाधान मिळालेले नाहीं. असा एकंदर मागील संशोधनाचा डोलारा अनिश्चित व डळमळीत पायावर उभा असतांना त्याच्या आधारे आजचीं परस्परांविषयीची धोरणे ठरविणें असमंजसपणाचें होईल. भारती समाजाच्या एकीकरणाविषयी एवढे प्रास्ताविक विचार सांगून आदिवासींच्या प्रश्नाविषयी थोडक्यांत निरूपण करतो आणि मग अस्पृश्य व आदिवासी या दोन्ही समानांविषयीं कांही सामान्य कल्पना सांगून हें विवरण संपवितों.
 अस्पृश्यतेच्या प्रश्नाप्रमाणेच आदिवासींच्या प्रश्नाकडे काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासून लक्ष पोंचविलेले आहे. १९३७ सालीं सत्ता हात आली तेव्हांपासून बहुतेक प्रांतिक सरकारांनी आपापल्या प्रांतांत आदिवासी मंडळे स्थापून कातकरी, वारली, भिल्ल, गोंड, संताळ, नाग, भूईया, भिनवर, महातोस, कोरकू, होस, कोल, मुंडा, इ. जमातींच्या उत्कर्षासाठी प्रयत्न आरंभिले. त्याच्याहि आधी इंग्रज मिशनऱ्याप्रमाणे या वन्य जमातीच्या वस्तीत जाऊन राहून त्यांना सुसंस्कृत जीवनाच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न अनेक समाजसेवकांनी केला होता. आतां स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी भारताच्या घटनेंतच योजना केली असून तिच्या अन्वयें अध्यक्षांनी लक्ष्मीदास श्रीकांत या त्याकामी आतांपर्यंत सर्व आयुष्य ज्यांनीं वेचले आहे अशा, गृहस्थांची नेमणूक केली आहे. सात जून १९५२ रोजीं दिल्लीला या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची व सरकारी अधिका-