पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८८
भारतीय लोकसत्ता

 पण हा इतिहास पहाण्यांत आणखी एक हेतु आहे. अलीकडे मागले इतिहास वेदकाळापर्यंत चाळून त्यांतून जुने अन्याय व जुनीं वैरें उकरून काढून त्या अन्वयें भावी धोरणे आखावीं असे प्रयत्न चालू आहेत. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादाचे विवेचन केले त्यांत असली उदाहरणे भरपूर दिली आहेत. त्याच ग्रंथांतून अस्पृश्यसमाजाविषयीं अशाच तऱ्हेचे प्रतिपादन केलेले आढळते. त्याशिवाय 'हू वेअर दि अन्टचेबल्स' अशासारखे ग्रंथाहि याच हेतूने लिहिले जात आहेत. आतां आदिवासी जमाती पुढे येऊं लागल्या की त्यांच्यांतून नवे पंडित निर्माण होऊन तेहि याच तऱ्हेचे ग्रंथ लिहूं लागतील. केवळ सत्यसंशोधन किंवा इतिहासजिज्ञासा एवढयाच बुद्धीने हे प्रयत्न झाले तर त्यांचे कोणीहि स्वागतच करील. पण सध्यांची प्रक्रिया निराळी आहे. जुन्या काळच्या अन्यायाच्या जाणीवा चेतवून नवा संताप त्या त्या जमातीत निर्माण करावा आणि प्रत्येक जमातीने आपल्याला स्वतंत्र स्थान या भरतभूमीत मागावें, अशा वळणानें हें पांडित्य चाललेलें दिसते. द्रविडीस्थानची मागणी, शिखीस्थानची मागणी, स्वतंत्र नागराष्ट्राची मागणी, या मागण्या याच जातीच्या आहेत. या मागण्या प्रबळ झाल्या, त्या त्या बाबतींत त्यांचा प्रभाव पडून त्यांना त्या जमातीचे पाठबळ मिळालें, तर हिंदुस्थानचीं अनंत शकले होऊन येथे युरोपांतल्याप्रमाणे नित्य युद्धे, मारामाऱ्या, आक्रमणे यांचे खैदान सुरू होईल. आणि त्यांमध्ये, ज्यांनी अन्याय केला त्यांचीच नव्हे तर आतांपर्यंत अन्यायानें जे पीडिले गेले त्यांचीहि आहुति पडून, हा भारती समाज पूर्वीपेक्षांहि छिन्नभिन्न होऊन, पुन्हां त्याला गुलामगिरी प्राप्त होईल.
 या जुन्या इतिहासाच्या संशोधनाविषयीं एक महत्त्वाचा विचार सांगावासा वाटतो. भारतीय व पाश्चात्य पंडितांनी या प्राक्- कालीन घडामोडींविषयीं इतकीं परस्पर भिन्न मतें सांगितलीं आहेत, इतक्या वेगळाल्या उपपत्ति बसविल्या आहेत आणि जुन्या घटनांचे इतके वेगवेगळे अर्थ केले आहेत की, त्यांच्या आधारें आज अन्यायाचे खापर किंवा कल्याणबुद्धीचें श्रेय अमक्या एका जमातीस देणें सर्वथा अशक्य आहे हें कोणाच्याहि सहज ध्यान येईल. आणि त्यावरून आजचे धोरण ठरविणे हें तर अगदीच वेडेपणाचें होईल, येथें बाहेरून कोण आले व मूळचे येथले