पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७
मानवत्वाची प्रतिष्ठा

समाज जर्जर झालेला असतांना, लोकशाहींच्या जडयंत्रणेचे सर्व नियम पाळून, सरकारच्या मागें बहुमत टिकवून धरून, ते सरकार स्थिर व दृढ असे टिकवून धरण्यांत आपल्याला जे यश आले आहे ते खरोखरच अतुल असें आहे, हा विचार लोकांच्या गळीं उतरेल अशी आशा वाटते.
 अर्थात् झाली ही गोष्ट अपूर्व असली तरी ही अपूर्वाई अशीच टिकून राहील अशी शाश्वती देणे कठीण आहे. आपल्यापुढे दुर्लध्य असे अनेक पर्वत उभे आहेत. कामगार, किसान व अस्पृश्य यांचे प्रश्न सोडविल्यावांचून आपल्या शासनाच्या यशाचे मोजमाप करणे सयुक्तिक ठरणार नाहीं. येथील बहुसंख्य जनता दारिद्र्यांत आहे, अज्ञानांत आहे, अंध आहे. ती सुखी, सज्ञान व विवेकी झाल्यावांचून भरतभूमीच्या लोकसत्तेला सामर्थ्य प्राप्त होणार नाहीं. याशिवाय काश्मीरचा प्रश्न, पाकिस्तानच्या संभाव्य आक्रमणाचा प्रश्न, जातीयतेचा प्रश्न, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न, निर्वासितांचा प्रश्न असे अनेक बिकट प्रश्न आपल्यापुढे उभे आहेत. या समस्यांची उत्तरे दिल्यावांचून आपली लोकसत्ता दृढ व बलशाली होणे शक्य नाहीं. या सर्व समस्या सोडवावयाच्या तर आपल्याला भारतीय लोकसत्तेचा फार सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे; तरच जगांतील इतर राष्ट्रांना जे निधान प्राप्त झाले नाहीं आणि आपल्या सुदैवानें जे आपल्याला प्राप्त झाले आहे, त्या निधानाचे आपल्याला रक्षण करतां येईल.
 या निधानाचें रक्षण करावयाचे, त्याची जपणूक करावयाची तर तें निधान आपल्या हातीं आले कसे याचा इतिहास पहाणें अवश्य आहे. लोकशाहीचा जो रोपा आपल्या हातीं आला आहे तो आम्रवृक्षाचा आहे हे खरे, पण त्याची एका महावृक्षांत परिणति घडवून आणण्यास फार कष्ट करण अवश्य आहे आणि म्हणूनच या रोप्यासाठीं पूर्व काळीं पूर्वसूरींनीं कोणते कष्ट घेतले ते आपणांस समजले पाहिजे, ते समजले तरच कोणत्या जीवनद्रव्यामुळे हा रोपा आतांपर्यंत पोसत आला, कोणत्या सत्त्वामुळे त्यानें आपली अलौकिक जाति टिकवून धरली हे आपणांस कळेल, आणि तींच जीवनद्रव्ये त्याला अखंड पुरवीत राहून त्याची यापुढेहि जोपासना कशी करावी याविषयींचे धोरण आखतां येईल. जगांत जे घडलें नाहीं, ते तेथे पांचसहा वर्षांत घडत आहे अर्से, इतर देशांचा निर्वाळा देऊन