पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८७
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

द्रवीड यांचे तर सर्रास रक्तसंबंध होऊन नर्मदेच्या दक्षिणेस या दोन जमाती भिन्न राहिल्याच नाहींत. ज्या जति अशा रीतीनें एक झाल्या नाहीत त्या जातिव्यवस्थेत आर्थिक दृष्टीनें परस्परावलंबी होऊन राहिल्या. पण कोणचीहि जमात कशाहि स्वरूपांत येथें राहिली तरी हिंदुत्वाच्या सूत्रांत तिची गुंफण झाल्यावांचून राहिली नाहीं. आणि एकदां या कक्षेत आल्यानंतर आपल्या गुणकर्माप्रमाणे कोणच्याहि उच्च पायरीवर जाण्यास सर्वांना मुभा होती. रजपूत हे कोणाच्या मतें बाहेरून आलेले आहेत. पण क्षत्रिय वर्णाच्या उच्च पदवीवर त्यांना सहज जातां आले. 'मग' जमातीचे लोक येथे आल्यावर ब्राह्मणवर्णीय झाले. वन्य जमातींचे इतिहास लिहिणाऱ्यांपैकी अनेकांनी त्या जमाती हिंदुत्वांत समाविष्ट झाल्यावर क्षत्रिय म्हणून मान्य झाल्याची उदाहरणे दिली आहेत. इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत ही एकीकरणाची, सहिष्णुतेची, संग्रहाकतेची व उदारतेची परंपरा चालू होती असें दिसते. त्या काळाच्या आधींच्या आठदहा शतकांत शक, युएची, कुशान, हूण इ. सातआठ जमातींचे प्रचंड लोंढेच्या लोंढे भारतांत आले व लक्ष लक्ष संख्येने येथे स्थायिक झाले; पण ते आपल्या भिन्न रूपानें हिंदुस्थानांत आज कोठेंहि दिसत नाहींत. ते कोट्यवधि लोक हिंदुसमाजानें आत्मसात् करून टाकले. इतका जिवंतपणा त्या वेळेपर्यंत हिंदुसमाजांत होता. पुढे मात्र याविषयींचें तत्त्वज्ञान, घोरण, आचार- सर्वच बदलून गेले. भेद टिकवून धरण्याचीच प्रवृत्ति आपल्या समाजांत बळावली व त्यांतच लोक भूषण मानूं लागले. त्यामुळे तोपर्यंत चालत आलेली एकीकरणाची प्रक्रिया थांबून जुने भेद सांधले गेले नाहीत आणि नवीन ज्या मुसलमान जमाती येथे आल्या त्यांना आत्मसात् करण्याचे कार्य कोणी प्रारंभिलें सुद्धां नाहीं. या विपरीत धोरणामुळे आजच्या हिंदुसमाजापुढे अनेक बिकट प्रश्न येऊन उभे राहिले आहेत.
 हा जुना इतिहास थोड्याशा विस्ताराने देण्याचा हेतु असा कीं सातव्या शतकांत थांबलेली समाजाच्या एकीकरणाची ही प्रक्रिया आपण नुसती पुढे चालू केली तर अस्पृश्य, आदिवासी व मुसलमान यांच्यासह म्हणजे यांना संगृहीत करून घेऊन नवा भारती समाज निर्माण करणे आपणांस सुलभ होईल हे आपल्या ध्यानी यावें.